जुना फोटो शेअर करत म्हणाले, ‘हीच संघटनेची शक्ती…’
नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह यांनी केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पक्षामध्ये काही सुधारणांची गरज असल्याबद्दल त्यांनी एक पत्र लिहिले होते. त्यानंतर अवघ्या आठवडाभरातच दिग्विजय सिंह यांची ही पोस्ट समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ९० च्या दशकातील एक ‘ब्लॅक अँड व्हाईट’ फोटो शेअर करत त्यांनी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) कौतुक केले आहे. काँग्रेस पक्ष हा नेहमीच विविध मुद्द्यांवरून भाजपा आणि आरएसएसवर टीका करत असतो, अशा परिस्थितीत सिंह यांनी केलेले हे कौतुक चर्चेचा विषय ठरले आहे.
मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री सिंह यांनी सोशल मीडियावर कोरा (Quora) चा एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. या फोटोमध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी गुजरातमध्ये कार्यक्रमात सहभागी झाल्याचे दिसत आहेत, तर तरुण नरेंद्र मोदी अडवाणी यांच्या जवळ जमिनीवर बसलेले दिसत आहेत. पं. मोदी यांचा उल्लेख कर त काँग्रेस नेते सिंह यांनी भाजपा आणि आरएसएचे कौतुक केले आहे. कशा प्रकारे कधीकाळी जमिनीवर बसणारा सामान्य कार्यकर्ता संघ-भाजपा व्यवस्थेमध्ये वरपर्यंत पोहचू शकतो आणि मुख्यमंत्री आणि पंतप्रधान बनू शकतो, हीच संघटनेची शक्ती आहे. जय सिया राम, असे सिंह म्हणाले.
सिंह यांच्या पोस्टमुळे भाजपला काँग्रेसवर टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे. भाजप प्रवक्ते सी.आर. केशव यांनी याला 'ट्रुथ बॉम्ब' म्हटलं. "दिग्विजय सिंह यांच्या टिप्पणीने काँग्रेसमधील हुकूमशाही आणि अलोकतांत्रिक नेतृत्वाचा बुरखा फाडला आहे. राहुल गांधी आता यावर प्रतिक्रिया देण्याचे धाडस दाखवतील का?", असा सवालही त्यांनी केला आहे.
पक्षश्रेष्ठींना स्पष्ट संकेत?
दिग्विजय सिंह यांनी आपल्या पोस्टमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना टॅग केले आहे. त्यामुळे हा पक्षश्रेष्ठींना दिलेला एक सूचक संदेश असल्याची चर्चा राजकीय वतुर्ळात रंगली आहे. १९ डिसेंबर रोजी सिंह यांनी काँग्रेसमध्ये सत्तेच्या विकेंद्रीकरणाची आणि संघटनात्मक बदलांची मागणी केली होती. तसेच "राहुल गांधींना पटवून देणे सोपे नसते," अशी खंतही त्यांनी व्यक्त केली होती.
दिग्विजय सिंह यांच्या आक्रमक पवित्रा का घेतला?
दिग्विजय सिंह यांच्या या भूमिकेकडे त्यांच्या राजकीय भविष्याशी जोडूनही पाहिले जात आहे. त्यांची राज्यसभेची दुसरी टर्म पुढील वर्षी संपत असून, त्यांना तिसऱ्यांदा संधी मिळण्याची शक्यता धूसर आहे. मध्य प्रदेश काँग्रेसमध्ये कमलनाथ आणि मीनाक्षी नटराजन यांच्यासह जीतू पटवारी आणि उमंग सिंघार यांसारख्या 'दिग्विजय विरोधी' नेत्यांचे वर्चस्व वाढत असल्याने सिंह यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.