बीर बिलिंग : पॅराग्लायडिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या हिमाचल प्रदेशातील 'बीर बिलिंग'मध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. येथे उड्डाण केल्यानंतर थोड्याच वेळात पॅराग्लायडरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. या अपघातामुळे पर्यटक आणि पॅराग्लायडिंग कोच जमिनीवर कोसळले. अपघातात मोहन सिंग नावाच्या पायलटचा मृत्यू झाला. पर्यटक गंभीर जखमी झाला आहे.
मंडी जिल्ह्यातील बारोट येथील रहिवासी असलेले मोहन सिंग एका पर्यटकासोबत 'टँडम पॅराग्लायडिंग' करत होते. उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच हवेत पॅराग्लायडरचा तोल बिघडला आणि लाँच साईटजवळच पॅराग्लायडर कोसळले. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज 'बीर बिलिंग पॅराग्लायडिंग असोसिएशन'ने व्यक्त केला आहे.
अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाने तातडीने मोहन सिंग आणि जखमी पर्यटकाला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, मोहन सिंग हे गंभीर जखमी असल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सुदैवाने, सोबत असलेल्या पर्यटकाला किरकोळ दुखापत झाली असून प्राथमिक उपचारानंतर त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं सांगण्यात आलं आहे.
पॅराग्लायडिंग करताना अपघात झाल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेची चौकशी सुरू आहे. अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की मानवी चुकीमुळे, याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे साहसी खेळांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.