धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथे घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. शेतातील विहिरीत अडकलेली पाणबुडी (सबमर्सिबल मोटर) काढण्याच्या कामादरम्यान क्रेनचा विद्युत तारेला स्पर्श झाल्याने बाप-लेकासह चार जणांचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
शनिवारी दुपारी सुमारे १ च्या सुमारास ही दुर्घटना घडली. केशेगाव येथील गणपती शिवाप्पा साखरे यांच्या शेतातील विहिरीवर दुरुस्तीचे काम सुरू होते. विहिरीतील बिघडलेली पाणबुडी बाहेर काढण्यासाठी क्रेन बोलावण्यात आली होती. काम सुरू असतानाच मोटार वर खेचताना क्रेनचा लोखंडी भाग वरून जाणाऱ्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांना लागला. क्षणातच प्रचंड विद्युत प्रवाह क्रेनमधून खाली उतरला. शॉक इतका तीव्र होता की घटनास्थळी असलेल्या चौघांनाचा संधी जागीच मृत्यू झाला
या दुर्घटनेत कासिम कोंडीबा फुलारी (वय ५४) आणि त्यांचा अवघा १६ वर्षांचा मुलगा रतन कासिम फुलारी यांचा जागीच मृत्यू झाला. वडिलांच्या मदतीसाठी आलेल्या रतनचा असा दुर्दैवी अंत झाल्याने प्रत्येकाचे डोळे पाणावले. याच घटनेत रामलिंग नागनाथ साखरे (वय ३०) आणि नागनाथ साखरे (वय ५५) यांचाही करुण अंत झाला.
एकाच वेळी गावातील चार जणांचा असा मृत्यू झाल्याने केशेगावमध्ये शोककळा पसरली आहे. घटनास्थळी जमलेल्या नातेवाईकांचा आक्रोश ऐकून उपस्थितांचे काळीज पिळवटून निघाले. पाणी मिळवण्यासाठी सुरू असलेले काम मृत्यूचे कारण ठरेल, याची कुणालाही कल्पना नव्हती, अशी हळहळ ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. या दुर्घटनेमुळे शेतीकामातील सुरक्षिततेचा प्रश्न आणि शेतांमधून जाणाऱ्या महावितरणच्या उच्च दाबाच्या तारांचा धोका पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अल्पवयीन मुलासह चार जणांचा असा अंत झाल्याने संपूर्ण जिल्हा सुन्न झाला आहे.