पहिल्यांदाच सर्व ९० जागा लढणार, भाजप-शिवसेनेला आव्हान
भिवंडी : भिवंडी महापालिकेत ठाकरेंची शिवसेना-मनसे एकत्र आल्यामुळे भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. तर काँग्रेस-पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र निवडणूक लढवणार आहेत. उबाठा आणि मनसेची युती निश्चित झाली आहे. या युतीच्या माध्यमातून ठाकरे बंधूंनी पहिल्यांदाच भिवंडी महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्व ९० जागा लढवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आतापर्यंत शिवसेनेने भिवंडीत कधीही सर्व जागा लढवल्या नव्हत्या. त्यामुळे हा निर्णय राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
राज्यातील अलीकडील राजकीय घडामोडीनंतर भिवंडीचा राजकीय आखाडा तापताना दिसत आहे. २०१७ च्या भिवंडी महापालिका सभागृहातील १२ नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने मनसेसोबत युती करत सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्धार केला आहे.
युतीच्या अंतिम सूत्रानुसार, शिवसेना उद्धव ठाकरे गट ८० जागांवर, तर मनसे १० जागांवर निवडणूक लढवणार आहे. सुरुवातीला मनसेकडून २० जागांची मागणी करण्यात आली होती. मात्र ठाणे आणि भिवंडी येथे झालेल्या बैठकीनंतर चर्चेअंती १० जागांवर एकमत झाल्याने जागावाटपाचा तिढा पूर्णपणे सुटला आहे. या निवडणुकीमध्ये शिवसेना-मनसे युतीकडून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांनी निवडणूक तयारीला वेग दिला आहे. दरम्यान, महाविकास आघाडीतील काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी भिवंडी महापालिका निवडणूक एकत्रित लढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तर शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांची वरिष्ठ पातळीवर युती घोषित झाली आहे; परंतु स्थानिक पातळीवर स्वतंत्रपणे निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे यावेळी भिवंडी महापालिका निवडणूक बहुरंगी आणि अत्यंत चुरशीची होणार हे स्पष्ट झाले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसे यांची युती झाल्यामुळे शिंदेंची शिवसेना आणि भाजपसमोर मोठं राजकीय आव्हान उभं ठाकणार आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे भिवंडीत नवे राजकीय समीकरण तयार झाले आहे. त्यामुळे भिवंडीत कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागल्याचं दिसंतय.