मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत २१ जणांचा समावेश आहे. मुंबई महापालिकेत नगरसेवकांच्या एकूण २२७ जागा आहेत. या सर्व जागांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान आणि १६ जानेवारी रोजी मतमोजणी आणि निकाल आहे.
राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिकेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ३० डिसेंबरपर्यंतची मुदत आहे पण २७ डिसेंबरची संध्याकाळ झाली तरी प्रमुख पक्षांपैकी कोणीही उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. पण समाजवादी पक्षाने आघाडी घेत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी २१ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
समाजवादी पक्षाची २१ उमेदवारांची यादी २६ डिसेंबर रोजी तयार झाली होती पण सर्वोच्च पातळीवर शिक्कामोर्तब झाले आणि २७ डिसेंबरच्या संध्याकाळी ही यादी जाहीर झाली आहे.
