युवराज अवसरमल
क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम ' हा नवीन चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. दिवसेंदिवस मराठी भाषेच्या शाळा बंद होत आहेत. त्या टिकविण्यासाठी काय करता येईल यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारी एक अभिनेत्री आहे, ती म्हणजे कादंबरी कदम होय.
कादंबरीचे शालेय शिक्षण मराठी माध्यमाच्या शाळेत झाले. गोरेगाव पश्चिमेला विद्यावर्धिनी संचालित विद्यामंदिर शाळेत तिचे शालेय शिक्षण झाले. शाळांमधून कुमार कला केंद्राच्या आंतरशालेय अभिनयाच्या स्पर्धा होत होत्या. त्यामधील एकपात्री प्रयोगांमध्ये तिने काम केले होते. वक्तृत्व स्पर्धेत तिने भाग घेतला. त्यानंतर तिने विलेपार्लेच्या साठ्ये कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यावेळी तिने आंतरमहाविद्यालयीन एकांकिकेमध्ये सहभाग घेतला. तिने फिलॉसॉफीमध्ये ग्रॅज्युएशन केले. कॉलेजच्या पदवीपर्यंतचे शिक्षण संपण्याअगोदर तिला मालिकेमध्ये काम मिळाले होते. 'दीपस्तंभ' या प्रभात चॅनेलवरील मालिकेमध्ये ती काम करू लागली. त्यानंतर 'इंद्रधनुष्य' ही मालिका तिला मिळाली. अल्फा चॅनेलवर ती मालिका दाखवली जात होती. अभिनेत्री आशा काळे यांच्या सहा मुली दाखविल्या होत्या. त्यात सर्वात धाकट्या मुलीची भूमिका तिने साकारली होती. त्यानंतर काही काळ तिला कामे मिळाली नाहीत, तेव्हा तिने छोटी नोकरी देखील केली. त्यानंतर तिला एकामागून एक कामे मिळत गेली.
'ही पोरगी कुणाची' हा चित्रपट तिला मिळाला. ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंतसोबत काम करण्याचीही संधी तिला मिळाली. हा चित्रपट तिचा टर्निंग पॉइंट आहे. 'या गोजिरवाण्या घरात' या मालिकेमध्ये तिने दिग्दर्शक गिरीश मोहिते सोबत काम केले होते. त्यांनी तिला 'ही पोरगी कुणाची' या चित्रपटात प्रथम नायिकेची संधी दिली. त्यानंतर 'क्षणभर विश्रांती' हा चित्रपट तिला मिळाला. त्या चित्रपटामध्ये हेमंत ढोमेसोबत तिची जोडी होती. त्यामध्ये इतर कलाकारांमध्ये सचित पाटील, सोनाली कुलकर्णी, पूजा सावंत, भरत जाधव, शुभांगी गोखले यांचा समावेश होता. हेमंत सोबत 'क्षणभर विश्रांती' चित्रपटासाठी अलिबागला तिने शूटिंग केले होते आणि परत 'क्रांति ज्योती विद्यालय - मराठी माध्यम ' चित्रपटासाठी अलिबागला शूटिंग केले. चंद्रकांत कुलकर्णीं दिग्दर्शित 'चारचौघी' या नाटकाचे तिने दोन वर्षांत तीनशे पस्तीस प्रयोग केले. प्रेक्षकांना हे नाटक खूप आवडले होते.
मराठी शाळा वाचविण्यासाठी माजी विद्यार्थ्यांना बोलाविले जाते. त्या माजी विद्यार्थ्यांपैकी एक कादंबरी असते. ती दुबईला राहत असते. आता ती नवऱ्यासोबत भारतात आलेली असते. ती व तिचा नवरा दोघेही त्या शाळेत शिकले आहेत. सुमन भोईर नावाची व्यक्तिरेखा तिने साकारली आहे. त्यांना शाळेबद्दल खूप आस्था असते व त्या शाळेसाठी ते काय काय करतात, हे सारे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना हसवतो व तितकाच रडवतो. ज्या ज्या लोकांचे मराठी माध्यमातून शिक्षण झाले आहे, त्यांना हा चित्रपट पाहताना त्यांच्या शाळेची नक्कीच आठवण येणार आहे.
या चित्रपटातील कलाकारांसोबत काम करण्याविषयी विचारले असता कादंबरी म्हणाली की, सचिन खेडेकरांसोबत मी पहिल्यांदाच काम करीत आहे. मी कॉलेजला होते तेव्हा त्यांची रवी राय दिग्दर्शित 'सैलाब' मालिका यायची. ती मालिका पाहून मला वाटायचे की केव्हा मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळेल. आता या चित्रपटासाठी मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. क्षितीसोबत मला काम करण्याची खूप दिवसापासून इच्छा होती. ती इच्छा या चित्रपटात तिच्या सोबत काम केल्याने पूर्ण झाली. या चित्रपटात एकापेक्षा एक कलाकार आहेत, त्यांच्यासोबत काम केल्याने मला अगदी कृतज्ञ वाटले. मी या सिनेमाचा भाग आहे याचा मला अभिमान वाटतो.
या चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे यांच्यासोबत काम करताना कसे वाटले असे विचारले असता ती म्हणाली की या अगोदर मी हेमंत सोबत सहकलाकार म्हणून काम केलेले आहे आणि आता जवळपास पंधरा वर्षांनी आम्ही या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम केले आहे. आता हेमंतला पाहिल्यावर समजले की त्याला काय पाहिजे हे जाणणारा तो दिग्दर्शक आहे. एक संवेदनशील दिग्दर्शक आहे. मला फार बरे वाटले त्याच्या सोबत काम करताना. इंग्रजी भाषेला तिचा विरोध नाही, परंतु प्रत्येकाने आपली मातृभाषा जपावी असे तिला वाटते. मुले इंग्रजी माध्यमात शिकत असली तरी पालक म्हणून आपण त्याच्या मराठी भाषेकडे लक्ष दिले पाहिजे. त्याला मराठी भाषा लिहिता व वाचता आली पाहिजे. मराठी भाषेत त्याने आईला हाक मारली पाहिजे. मराठी शाळा टिकल्या पाहिजेत असे तिला वाटते.