अपघातग्रस्त तरुणीवर जबड्याची जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी
ठाणे : नेरळ परिसरात झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका तरुणीवर ठाणे सिव्हिल रुग्णालयात तुटलेल्या जबड्याची मॅक्सिलोफेशियल शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आली. खासगी रुग्णालयांचा महागडा खर्च परवडत नसल्याने सिव्हिल रुग्णालयाच्या उपचारांनी तिला नवे आयुष्य मिळाले. दुचाकीवरील अपघातात या तरुणीच्या डोक्याला आणि जबड्याला जोरदार मार बसला. अपघात इतका गंभीर होता की तिचा जबडा तुटला, काही दात निखळून पडले, आणि तोंड उघडताही येत नव्हते. पण खरी लढाई सुरू झाली ती योग्य उपचार मिळवण्यासाठी. खासगी रुग्णालयातील खर्च कुटुंबाच्या आवाक्याबाहेर असल्याने कुटुंबावर संकट कोसळले. याच काळात ठाणे सिव्हिल रुग्णालयात योग्य आणि दर्जेदार उपचार मिळेल, अशी माहिती मिळाल्याने कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पूजाला तातडीने ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल केले गेले. तिची अवस्था अत्यंत गंभीर होती. वरिष्ठ सर्जन डॉ. निशिकांत रोकडे, दंत शल्य चिकित्सक डॉ. अर्चना पवार, डॉ. ओमकार भोसले आदी तज्ज्ञांनी तत्काळ तपासणी केली. सिटीस्कॅन आणि एमआरआय अहवालानंतर शस्त्रक्रिया अत्यंत जोखमीची असल्याचे स्पष्ट झाले. चेहऱ्याच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेसाठी नायर रुग्णालयातील मॅक्सिलोफेशियल डॉ. कार्तिक पुंजा यांना पाचारण करण्यात आले. सलग चार तास चाललेल्या शस्त्रक्रियेत तुटलेल्या जबड्याच्या हाडाच्या जागी नवीन हाड बसवण्यात आले. ही शस्त्रक्रिया वैद्यकीय कौशल्यासोबतच मानवी संवेदनशीलतेची कसोटी होती.
आज तरुणी हळूहळू सावरत आहे. शस्त्रक्रियेत डॉ. कार्तिक पुंजा, डॉ. निशिकांत रोकडे, डॉ. ओमकार भोसले, डॉ. रूपाली यादव, डॉ. अर्चना पवार, डॉ. संकेत शिंदे यांसह सर्वांनी अथक परिश्रम घेतले. डॉ. कैलास पवार यांनी सांगितले, “रुग्ण गरीब आहे की श्रीमंत, हा प्रश्न आमच्यासाठी कधीच महत्त्वाचा नसतो. वेळेवर उपचार मिळाले तर जीव वाचतो. हेच ठाणे सिव्हिल रुग्णालयाचे खरे ब्रीद आहे.”