प्रत्येक मैफलीत नवा कलाकार अशी संकल्पना
मुंबई : भारतीय शास्त्रीय संगीताच्या संवर्धन व प्रचारासाठी गेली दोन दशके सातत्याने कार्यरत असलेले पंचम निषाद प्रस्तुत प्रातःस्वर आपल्या २० यशस्वी वर्षांचा उत्सव साजरा करत आहे. या निमित्ताने १३६वी प्रातःस्वर मैफिल रविवार, २८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ६.३० वाजता, कलांगण, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. ही मैफिल सर्व रसिकांसाठी विनामूल्य असून, शास्त्रीय संगीत सर्वांपर्यंत पोहोचावे, हा या उपक्रमाचा मूलभूत उद्देश आहे.
सन २००६ पासून सुरू झालेल्या प्रातःस्वर उपक्रमाने आपल्या वैशिष्ट्यपूर्ण सकाळच्या मैफिली आणि ‘प्रत्येक मैफिलीत नवा कलाकार’ या आगळ्यावेगळ्या संकल्पनेमुळे मुंबईच्या सांस्कृतिक जीवनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. २० वर्षांच्या या प्रदीर्घ वाटचालीतही ही परंपरा अखंडपणे सुरू आहे. या १३६ व्या प्रातःस्वर मैफिलीत पं. गौरव मजुमदार सतारवादन सादर करणार आहेत तर आजच्या पिढीतील अग्रगण्य सतारवादक तसेच भारत रत्न पं. रविशंकर यांचे ज्येष्ठ शिष्य यशवंत वैष्णव त्यांच्या सोबत तबल्यावर साथ करणार आहेत. ग्रॅमी नामांकन प्राप्त पं. गौरव मजुमदार हे भारतीय तसेच जागतिक संगीतविश्वातील एक मान्यवर नाव आहे. अलाहाबाद येथील नामांकित संगीतपरंपरेत वाढलेल्या पं. मजुमदार यांनी पं. रविशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरु–शिष्य परंपरेत सतारवादनाचे सखोल शिक्षण घेतले. दिल्ली येथील गुरुगृहात सात वर्षे वास्तव्यास राहून त्यांनी या महान परंपरेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. प्रारंभी गायन, नंतर व्हायोलिन आणि अखेरीस सतार असा त्यांचा संगीतप्रवास गेल्या ३२ वर्षांपासून अखंड सुरू आहे. त्यांची सतारवादनशैली धृपद–बीनकार परंपरेवर आधारित असून, त्यात खयाल व ठुमरी या शैलींचाही प्रभाव जाणवतो. ही परंपरा त्यांना मैहर घराण्याचे जनक उस्ताद बाबा अलाउद्दीन खान यांच्या सेनिया घराण्यातून लाभली आहे.
पं. गौरव मजुमदार यांनी पूर्व व पश्चिमेकडील अनेक नामवंत कलाकारांसोबत सहकार्य केले असून, सिंफनी ऑर्केस्ट्रा, चित्रपट, बॅले तसेच विविध संगीतप्रकारांसाठी त्यांनी संगीत रचना केली आहे. त्यांनी काही मौलिक रागांची निर्मिती केली असून, त्यातील राग ‘आकांक्षा’ हा नवीन सहस्रकाच्या स्वागतासाठी व्हॅटिकन येथे सादर करण्याचा दुर्मिळ सन्मान त्यांना लाभला—जो जागतिक शांततेस अर्पित होता. ऑलिम्पिक २००४ च्या निमित्ताने अथेन्स येथील अॅक्रोपोलिस येथे सादर झालेल्या फिलिप ग्लास यांच्या ‘Orion’ या ऐतिहासिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग होता. आज पं. गौरव मजुमदार हे सध्याच्या पिढीतील अग्रगण्य संगीतकार म्हणून जागतिक पातळीवर सादरीकरण, अध्यापन आणि संगीतनिर्मिती करत आहेत.
पंचम निषाद प्रस्तुत प्रातःस्वरची ही विशेष सकाळची मैफिल शिस्त, साधना आणि रागसौंदर्याचा अविस्मरणीय अनुभव रसिकांना देणारी ठरेल.