ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...
नवी दिल्ली : भारतीय लष्कराने आपल्या सोशल मीडिया वापराच्या धोरणात महत्त्वाचा बदल केला आहे. यानुसार, आता लष्करातील जवान आणि अधिकारी इंस्टाग्रामचा वापर केवळ देखरेखीसाठी आणि बघण्यासाठीच करू शकतील. महत्त्वाचे म्हणजे, त्यांना कुठल्याही पोस्टवर 'लाईक' करता येणार नाही, कमेंट करता येणार नाही, तसेच, ते कोणती पोस्टदेखील अपलोड करू शकणार नाहीत. तसेच, डिजिटल वापरासंदर्भातील लष्कराचे आधीचे सर्व नियम कायम असणार आहेत.
सोशल मीडिया वापराबाबतचे हे नवे निर्देश लष्कराच्या सर्व युनिट्स आणि विभागांना जारी करण्यात आले आहेत. याचा उद्देश, जवानांना सोशल मीडियावरील मजकूर पाहण्याची आणि माहिती मिळवण्याची मर्यादित मुभा देणे आहे. जेणेकरून जवान इंटरनेटवरील बनावट आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीची ओळख पटवू शकतील आणि त्यासंदर्भात आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊ शकतील. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी नुकत्याच पार पडलेल्या 'चाणक्य डिफेन्स डायलॉग'मध्ये या नियमांचा उल्लेख केला होता. आजची 'जेनरेशन झेड' लष्करात सामील होत असताना स्मार्टफोन ही त्यांची मोठी गरज बनली असल्याचे त्यांनी मान्य केले. एनडीएमध्ये येणाऱ्या कॅडेट्सना फोनशिवायही जगता येते, हे पटवून देण्यासाठी तीन ते सहा महिने लागतात, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जवानांच्या वैयक्तिक जीवनासंदर्भात बोलताना, जनरल द्विवेदी म्हणाले, "स्मार्टफोन आजच्या काळातील मोठी गरज बनला आहे. जवान नेहमी फील्डवर असतात. कुटुंबातील जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी, पालकांशी, पत्नीशी संवाद साधण्यासाठी फोन आवश्यक आहे. तसेच वाचनासाठी सोबत किती पुस्तके नेणार? फोनवर वाचणे सोपे आहे." दरम्यान, सोशल मीडियावर मजकूर कधी अपलोड करावा आणि काय पोस्ट करावे, यासंदर्भातही त्यांनी यावेळी भाष्य केले.