मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली असून उबाठाचे पक्ष आणि राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत याची अधिकृत घोषणा केली आहे. ठाकरे बंधूंच्या युतीवर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली आहे. आता झालेली युती ही सत्तेसाठी असल्याची टीका त्यांनी केली आहे. तसेच ज्यांना आपली पोरं सांभाळता आली नाही ते राज्य काय सांभाळणार? असा तिखट सवालही शिंदे यांनी उपस्थित केला.
शिंदे म्हणाले की, काही युत्या या जनतेच्या विकासासाठी होतात, महायुती ही जनतेच्या विकासासाठी, मुंबईच्या विकासासाठी आहे. पण आता झालेली युती ही सत्तेसाठी आहे. निवडणुका आल्यावरच यांना मराठी माणूस आठवतो, असा टोला शिंदे यांनी लगावला आहे. तसेच युती कोणाची कोणाशीही झाली तरी आमची महायुती ही महाराष्ट्रामध्ये मजबुतीने उभी आहे. लोकसभा विधानसभा, नगरपालिकांमध्ये महायुती जिंकली. त्यामुळे अशा सत्तेसाठी झालेल्या युत्यांमुळे काही फरक पडत नाही, असेही शिंदे म्हणाले.
ठाकरे बंधूंची झालेली युती ही स्वार्थासाठी
एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबई महापालिकेकडे यांनी सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहिली. आता ही कोंबडीच कापून खायचे काम सुरू आहे. ठाकरे बंधूंची झालेली युती ही स्वार्थासाठी आणि अस्तित्व टिकवण्यासाठी आहे; परंतु, जनता त्यांना त्यांची जागा दाखवणार. ठाकरे बंधूंची युती झाली तरीही विठ्ठल आमच्याकडे आहे, असे शिंदे म्हणाले. यांच्याकडे मुंबईच्या विकासाचा अजेंडा नाही. त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये विकासावर एकही शब्द बोलले नाहीत. यांचा अजेंडा हा फक्त सत्तेसाठी आहे. बाळसाहेबांचा विचार ज्यांनी सोडला त्यांना राज्यातल्या जनतेने त्यांची जागा दाखवली आहे. असली काय आणि नकली काय हे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दाखवले असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.
त्यांनी मुंबईसाठी काय केले?
तसेच आम्ही विचारधारेला पुढे घेऊन जाणारे आहोत. मुंबईचा विकास हाच आमचा अजेंडा आहे. त्यांनी मुंबईसाठी काय केले हे सांगावे. मुंबईकर हा मुंबईच्या बाहेर फेकला गेला तो यांच्यामुळे. या मराठी माणसाला मुंबईत परत आणण्याचे काम आम्ही करणार आहोत. त्यांच्या पुनर्विकासाचे काम आम्ही करत आहोत. रमाबाई आंबेडकरमधील १७ हजार घरांचे काम आम्ही मार्गी लावले आहे. त्यांच्याकडे काय अजेंडा आहे? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला.
जे आपली पोरं सांभाळू शकत नाहीत ते राज्य काय सांभाळणार?
एकनाथ शिंदे म्हणाले, जेव्हा निवडणुका येतात त्यावेळी हे 'मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार' असा बोर्ड लावतात. मुंबईकर सुज्ञ आहेत, त्यांना विकास पाहिजे आहे. आम्ही घेतलेले निर्णय हे मुंबईकरांच्या हितासाठीचे आहेत. पुढच्या सहा महिन्यात मुंबई खड्डेमुक्त होणार, असे त्यांनी सांगितले. तसेच ठाकरेंनी कोरोना काळात फक्त पैसाच खाल्ला. जे आपली पोरं सांभाळू शकत नाहीत ते मुंबई काय सांभाळणार? असा सवालही शिंदेंनी उपस्थित केला.