गुरू : एक किल्ली मुक्तीची

ऋतुजा केळकर, ऋतुराज

गुरू प्रकाशी ज्ञानदीप, शिष्य हृदयी उजळतो ।
संसारसागर पार करावा, श्रद्धा विश्वास आधारतो ॥


माझी केलेली पूजा जेव्हा नकळत परत वळून पाहिली, तेव्हा लक्षात आले की आपल्या आयुष्याचा पहिला गुरू म्हणजे आई. आईच्या कुशीतच आपण प्रथम शिकतो बोलणे, चालणे, वागणे, तसेच चांगले-वाईट यातील फरक ओळखणे. तिच्या अंगी असलेली निस्सीम करुणा, त्याग आणि प्रेम हेच गुरुशिष्य नात्याचे मूळ बीज आहे. तिच्या मार्गदर्शनानेच बालकाच्या मनात श्रद्धा, दया आणि समभावाची पायाभरणी होते. म्हणूनच गुरुशिष्य परंपरेचा आरंभ आईपासून होतो आणि पुढे जीवनात येणाऱ्या प्रत्येक गुरूचे महत्त्व समजून घेण्याची क्षमता तिच्या संस्कारांतूनच निर्माण होते.


जीवनाच्या गजबजाटात, अडचणींच्या वावटळीत, सामान्य मानवाला सद्गुरू म्हणजे जणू एखादं सावलीदार झाड वाटतं. वस्तुस्थितीचा विचार न करता जो दिसेल त्याला गुरू मानून शरण जातो. त्याच्या मनात आत्मोद्धाराची खरी लालसा नसते, त्याला हवी असते संसारातील सुखसोयी, धनप्राप्ती, ऐश्वर्याचा लाभ आणि संकटांपासून मुक्ती म्हणूनच त्याला कोणताही गुरू चालतो.


ही शरणागती जणू एखाद्या तहानलेल्या प्रवाशाने पहिल्या दिसलेल्या विहिरीत डोकं घालावं तशी असते. पण खरी तहान ही आत्मज्ञानाची असते आणि ती भागवणारा गुरू विरळाच असतो. सामान्य मानवाला हे उमजत नाही, म्हणून तो भौतिक अपेक्षांच्या ओढीने गुरूकडे वळतो. अशा शरणांगतीतून त्याला तत्कालिक दिलासा मिळतो पण, आत्मोद्धाराचा मार्ग मात्र अंधारातच राहतो.


गुरूच्या वचनावर विश्वास असेल तरच जगण्यास बळ प्राप्त होते. गुरूचे वचन हे केवळ शब्द नसून, ते साधकाच्या अंतःकरणात दीपप्रकाशासारखे उजळतात. संकटांच्या काळोखात तेच मार्गदर्शक ठरतात. श्रद्धेने गुरूचे वचन स्वीकारणारा शिष्य जीवनातील दुःख-सुखांना धैर्याने सामोरे जातो. गुरूच्या वचनावरचा विश्वास म्हणजे जणू वादळातही स्थिर राहणारा ‘दीपस्तंभ’ जो शिष्याला योग्य दिशा दाखवतो, त्याला आत्मविश्वास देतो आणि
त्याच्या जीवनप्रवासाला स्थैर्य प्रदान करतो.


गुरुशिष्य नात्याचा महिमा हा नामघोषातही दडलेला आहे. “मंगलमूर्ती मोरया” म्हणताना भक्तांच्या ओठांवर उमटणारे नाव हे केवळ देवतेचे नसते, तर ते गुरुशिष्य नात्याचे प्रतीक असते. जसे कुलूप उघडण्यासाठी योग्य किल्ली लागते, तसेच आत्मोद्धारासाठी योग्य गुरू लागतो. चुकीची किल्ली वापरली तर कुलूप उघडत नाही, तसेच खोट्या गुरूंच्या मागे लागल्यास जीवनाचा दरवाजा बंदच राहतो.


गुरूच्या छायेत शुचित्वाची अनुभूती होते. शुचित्व म्हणजे मन, वाणी आणि आचरणाची पवित्रता होय. गुरूच्या सहवासात मनातील दगडासारखी कठोरता वितळते, संवादात तारतम्य येते आणि समभावाची नवी किल्ली सापडते. ही किल्ली उघडते करुणेचे दरवाजे की जिथे भूतदया आणि सहानुभूतीचा प्रवाह अखंड वाहतो.


जीवनप्रवाहाचे गूढ रहस्य गुरू आपल्याला दिव्यांच्या प्रवाहातून दाखवतात. नदीवर तरंगणारे दिवे कधी एकत्र येतात, तर कधी दूर जातात. प्रत्येक दिव्याचा मार्ग वेगळा असतो, जसे प्रत्येकाच्या आयुष्याची दिशा निराळी असते. तरीही त्या संथ लहरींवर अलगद वाहणाऱ्या दिव्यांकडे पाहताना मनाला जाणवते जीवन म्हणजे प्रवाह आणि गुरू म्हणजे त्याला दिशा देणारी लेखणी. लेखणी दगडावर चालली तरी अक्षर उमटते तसेच गुरूच्या मार्गदर्शनाने कठीण जीवनप्रवाहातही अर्थ उमटतो.


गुरूंची आवश्यकता ही धर्माइतकीच जीवनमार्गासाठी महत्त्वाची आहे. पण आजच्या काळात खोट्या वेषधारी गुरूंचा तांडा वाढत चालला आहे. अपात्र गुरूच्या मागे लागणे म्हणजे एका आंधळ्याने दुसऱ्या आंधळ्याच्या मागे जाण्यासारखे आहे. अखेर दोघेही अधोगतीला जातात. अधिकारी गुरूकडे अनुभवजन्य ज्ञान असते, जे केवळ शास्त्रचर्चेने मिळत नाही. सद्गुरूंचे आचरण साधे असते, पण त्यांची अंतःकरणातील शांतता, करुणा आणि आत्मज्ञान विलक्षण असते. ते प्रसिद्धीपासून दूर राहतात, अखंड नामस्मरण करतात आणि सुख-दुःखांपासून अलिप्त राहतात.


गुरू म्हणजे जीवनाच्या अंधाऱ्या गुहेत प्रकाश दाखवणारी मशाल. ते शिष्याच्या मनातील गोंधळाला दिशा देतात आणि त्याच्या विचारांना आकार देतात. जसे दगडावर चाललेली लेखणी अक्षर उमटवते, तसेच गुरू कठीण प्रसंगांतही अर्थ उमटवतात. त्यांच्या सहवासात शिष्याला करुणेची किल्ली मिळते, जी जीवनातील कठोर कुलूपे सहज उघडते. खोट्या वेषधारी गुरूंच्या मागे लागल्यास प्रवास अधोगतीकडे वळतो, पण सद्गुरूंच्या छायेत श्रद्धा, शुचित्व आणि आत्मविश्वासाची नवी वाट सापडते. जीवनप्रवाहात कधी एकाकीपणाचे क्षण येतात, तर कधी एकत्रतेचे, पण गुरूंच्या मार्गदर्शनाने प्रत्येक क्षणाला नवा अर्थ मिळतो. अखेरीस, गुरू म्हणजेच तो दीप, जो शिष्याच्या अंतःकरणात उजेड पेरतो, त्याला स्थैर्य देतो आणि जीवनसागर पार करण्यासाठी आत्मज्ञानाची नौका बनतो. गुरूंच्या प्रकाशाशिवाय जीवन म्हणजे अंधारातली वाट आहे पण, त्यांच्या कृपेनेच ती वाट मुक्तीकडे सरते. म्हणूनच ही एक अशी किल्ली आहे की जी, आत्म्याच्या कुलूपात फिरली की, जीवनाचा दरवाजा मुक्तीकडे उघडतो.

Comments
Add Comment

भाग्यविधाता

सद्गुरु वामनराव पै, जीवन संगीत आपला जो विषय आहे, अंधारातून प्रकाशाकडे त्याचा सरळ अर्थ आहे. तो म्हणजे अज्ञानातून

जैमिनीमुनी (पूर्वार्ध)

डॉ. अनुराधा कुलकर्णी, भारतीय ऋषी …anuradh.klkrn@gmil.com फार पूर्वी सर्व वेदमंत्र एकत्रच होते. त्या सहस्त्रावधी मंत्रात काहीत

मोह

प्राची परचुरे-वैद्य, आत्मज्ञान भाणूस जन्माला आला की त्याचे आयुष्य सुरू होते ते अगदी मरेपर्यंत. त्या

अध्यात्मिक जागृतीचे प्रतीक... कुंकुमतिलक

अर्चना सरोदे, मानाचा गाभारा हिंदू धर्मात विविध प्रकारच्या रुढी, परंपरा पाळल्या जातात. हिंदू धर्मात कपाळावर

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत 'रत्नजडित' रामाचे आगमन; १० फूट उंच, ३० कोटींची सुवर्णमूर्ती आणि तंजावर कलेचा अजोड संगम!

अयोध्या : रामजन्मभूमी अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या भक्तीचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. कर्नाटकातील अज्ञात

जीवनविद्या: काळाची गरज

जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै हे जग सुखी व्हावे व आपले हिंदुस्थान हे राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे या