मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे. बुधवारी जाहीर झालेल्या आयसीसी क्रमवारीत बुमराह १८व्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचे ६२२ रेटिंग गुण आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील शेवटच्या सामन्यात बुमराहने २ बळी घेऊन भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
भारताने ही मालिका ३-१ ने जिंकली होती, तर लखनऊमध्ये खेळला गेलेला चौथा सामना धुक्यामुळे रद्द करावा लागला होता. अहमदाबादमध्ये झालेल्या निर्णायक सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २३१ धावांचा मोठा डोंगर उभा केला. या सामन्यात तिलक वर्माने ४२ चेंडूत ७३ धावांची धमाकेदार खेळी केली. या शानदार कामगिरीनंतर तिलक वर्माने श्रीलंकेच्या पथुम निसांकाला मागे टाकत ८०५ रेटिंग गुणांसह फलंदाजांच्या क्रमवारीत तिसरे स्थान पटकावले. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेविसलाही त्याच्या कामगिरीचा फायदा मिळाला. त्याने वेगवान ३१ धावांची खेळी केली, ज्यामुळे त्याने पाच स्थानांची झेप घेऊन टॉप-१० फलंदाजांमध्ये स्थान मिळवले.
टी-२० बॉलर्स रँकिंगमध्ये भारताच्या वरुण चक्रवर्तीने आपले अव्वल स्थान आणखी मजबूत केले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत तो सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आणि त्याने एकूण १० बळी घेतले. तो दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडच्या जेकब डफीपेक्षा खूप पुढे आहे. टी-२० बॅटर्स रँकिंगमध्ये अभिषेक शर्मा नंबर वनवर आहे. इंग्लंडचा सलामीवीर फिल सॉल्ट दुसऱ्या स्थानावर कायम आहे. तर ८०५ रेटिंग पॉइंट्ससह तिलक वर्मा तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.