चंद्रपूरच्या पराभवानंतर मुनगंटीवारांचे 'बंड' की समन्वय?
मुंबई : राज्यात महायुतीचा विजयाचा वारू उधळत असताना चंद्रपूर जिल्ह्यात मात्र भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. जिल्ह्यातील ११ पैकी ८ जागांवर काँग्रेसने आपले वर्चस्व प्रस्थापित केले असून, भाजपला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. या पराभवानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केलेल्या एका विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. मात्र, काल (२३ डिसेंबर) त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची भेट घेत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. चंद्रपूरमधील खराब कामगिरीनंतर सुधीर मुनगंटीवार यांनी थेट पक्षाच्या धोरणांवरच बोट ठेवले होते. "काँग्रेसने त्यांच्या स्थानिक नेत्यांना ताकद दिली, मात्र माझ्या स्वतःच्या पक्षाने माझी ताकद कमी केली," असे खळबळजनक वक्तव्य त्यांनी केले होते. मुनगंटीवारांचा हा रोख थेट राज्याच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे, विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याची चर्चा सुरू झाली होती. स्वतःच्या बालेकिल्ल्यात झालेल्या या पराभवाचे खापर त्यांनी नाव न घेता वरिष्ठांवर फोडल्याने भाजपमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती.
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत 'बंद दाराआड' चर्चा
आपल्या विधानाने निर्माण झालेला तणाव पाहता, सुधीर मुनगंटीवार यांनी काल तातडीने मुंबई गाठून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. या बैठकीत चंद्रपूरमधील पराभवाची कारणे, स्थानिक समीकरणांमधील त्रुटी आणि भविष्यातील रणनीती यावर मंथन झाल्याचे समजते. भेटीनंतर मुनगंटीवार यांनी स्वतः ट्विट करत या भेटीची माहिती दिली आहे. "आमच्यात कोणतेही मतभेद नसून, जिल्ह्याच्या विकासासाठी आणि पक्षाच्या मजबुतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत," असा संदेश देण्याचा प्रयत्न त्यांनी या माध्यमातून केला. मुनगंटीवारांनी आपल्या आक्रमक विधानाचा सूर आता मवाळ केल्याचे चित्र दिसत आहे. मुनगंटीवारांसारखा अनुभवी नेता असतानाही चंद्रपूरमध्ये भाजपला यश का मिळाले नाही, याचा शोध आता पक्ष पातळीवर घेतला जात आहे. स्थानिक नेत्यांमधील समन्वय आणि वरिष्ठ स्तरावरून मिळालेले पाठबळ यातील अंतरामुळेच काँग्रेसला मुसंडी मारणे सोपे गेल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. आता या भेटीनंतर मुनगंटीवारांची ही 'नाराजी' कायमची दूर होणार का, की हा केवळ तात्पुरता समेट आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काय म्हणाले मुनगंटीवार?
चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेले असतानाच, राज्याचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील 'वर्षा' निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत मुनगंटीवारांनी आपल्या जिल्ह्यातील शेतकरी, आरोग्य आणि उद्योगांशी संबंधित प्रश्नांचा पाढा मुख्यमंत्र्यांसमोर वाचला. मुख्यमंत्र्यांनी या सर्व मागण्यांना अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले आहेत, ज्यामुळे चंद्रपूर आणि बल्लारपूर क्षेत्रातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकरी हिताचा विचार करून सुधीर मुनगंटीवार यांनी धानाच्या मुद्द्यावर आग्रही मागणी केली. त्यानुसार, शेतकऱ्यांना आता धानाचा प्रति हेक्टर २० हजार रुपये बोनस मिळणार आहे. याशिवाय, आधारभूत धान खरेदीसाठी नोंदणीची अंतिम मुदत आता ३१ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देताना, ३ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांनाही विशेष बाब म्हणून मदत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
बल्लारपूरचा कायापालट; रुग्णालय आणि औद्योगिक वसाहतीला मंजुरी
बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी मुनगंटीवारांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. मौजा विसापूर येथील बंद पडलेल्या पॉवर हाऊसची ३१.३५ हेक्टर जागा आता विकासासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. या जागेवर ईएसआयसी (ESIC) रुग्णालय, राज्य राखीव पोलीस बल आणि महिला सहकारी औद्योगिक वसाहत उभारली जाणार आहे. या निर्णयामुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून आरोग्य व्यवस्था अधिक बळकट होणार आहे. बैठकीनंतर सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील भूमिकेबद्दल त्यांचे आभार मानले. ते म्हणाले, "शेतकरी बांधवांच्या हितासाठी आणि आरोग्यविषयक महत्त्वाच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत दूरदर्शी निर्णय घेतले आहेत. बल्लारपूर आणि परिसरातील प्रलंबित कामांना यामुळे मोठी गती मिळणार आहे." या भेटीमुळे मुनगंटीवार आणि फडणवीस यांच्यातील समन्वयाचे नवे चित्र पाहायला मिळाले आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपमधील अंतर्गत नाराजीच्या चर्चांना या भेटीमुळे पूर्णविराम मिळाला आहे. मुनगंटीवारांनी केवळ राजकीय नव्हे, तर जिल्ह्याच्या विकास आराखड्यावर मुख्यमंत्र्यांशी सविस्तर खलबतं केली. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दिलेल्या निर्देशांमुळे आता प्रशासकीय स्तरावर हालचालींना वेग आला आहे.
नगरपालिकेच्या निकालानंतर मुनगंटीवार नेमकं काय म्हणाले होते?
चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बसलेल्या मोठ्या फटक्यानंतर ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अत्यंत स्फोटक प्रतिक्रिया दिली आहे. "आम्ही हा पराभव नम्रतापूर्वक स्वीकारतो, कारण विजयाने माजायचं नसतं आणि पराभवाने लाजायचं नसतं," असे म्हणत त्यांनी आपल्याच पक्षाच्या धोरणांवर आणि वरिष्ठ नेतृत्वावर जळजळीत शब्दांत ताशेरे ओढले आहेत. चंद्रपूरमधील पराभवाचे विश्लेषण करताना मुनगंटीवार यांनी थेट भाजपच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, "एककीडे काँग्रेसने आपल्या स्थानिक नेत्यांना सर्व ताकद आणि शक्ती दिली, तर दुसरीकडे माझ्याच पक्षाने माझी शक्ती कमी करण्याचे काम केले. चंद्रपूर जिल्ह्यात मुद्दाम गटबाजीला पोषक वातावरण निर्माण होईल, असे पक्षाचे धोरण दिसत आहे. त्याचाच परिणाम म्हणून जिल्ह्यातील ११ नगरपालिकांमध्ये आम्हाला अंतर्गत गटबाजीचा फटका बसला." पक्षात होणाऱ्या इनकमिंगवर टोला लगावताना मुनगंटीवार यांची फटकेबाजी पाहायला मिळाली. "शनिशिंगणापूरच्या मंदिराला जसे दरवाजे नाहीत, तसाच आमचा एकमेव पक्ष आहे ज्याचे दरवाजे कोणासाठीही कायम उघडे असतात. कोणालाही पक्षात घेताना ना जिल्हाध्यक्षांना विचारले जाते, ना जिल्ह्यातील नेत्यांना विश्वासात घेतले जाते. बाहेरच्या कोणालाही पक्षात प्रवेश दिला जातो," अशा शब्दांत त्यांनी पक्षप्रवेशाच्या गोंधळावर टीका केली. जिल्ह्यातील ११ नगरपालिकांमध्ये भाजपच्या पराभवामागे अंतर्गत कलह हेच मुख्य कारण असल्याचे मुनगंटीवार यांनी अधोरेखित केले. निष्ठावान नेत्यांना डावलून बाहेरून येणाऱ्यांना महत्त्व दिले जात असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. या विधानामुळे भाजपमधील 'जुने' विरुद्ध 'नवे' हा वाद आता उघडपणे समोर आला आहे.
विजयाचा माज नाही, पराभवाची लाज नाही
राजकीय संस्कारांची आठवण करून देताना मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले की, पराभवाने खचून न जाता आम्ही जनतेचा कौल स्वीकारला आहे. मात्र, पक्षश्रेष्ठींनी चंद्रपूरमधील या स्थितीचा गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सूचित केले आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील भाजपच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे.