३१ डिसेंबरची डेडलाईन; प्रक्रिया पूर्ण न केल्यास लाभ कायमचा बंद
मुंबई : महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेतून जवळपास ३० लाख लाभार्थी बाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या योजनेंतर्गत दरमहा मिळणारी
१ हजार ५०० रुपयांची मदत सुरू ठेवण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. मात्र, अद्याप ३० लाखांहून अधिक लाडक्या बहिणी अजूनही या प्रक्रियेपासून दूर आहेत. विहित मुदतीत ई-केवायसी न केल्यास योजनेचा लाभ कायमचा बंद होणार आहे.
राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने महायुती सरकारने जुलै २०२४ मध्ये 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना सुरू केली. ही योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत लाखो महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडले आहेत. घरखर्च, आरोग्य, शिक्षण आणि दैनंदिन गरजांसाठी हा निधी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
१ कोटी ६० लाख महिलांची ई-केवायसी पूर्ण
- सध्या राज्यात सुमारे २ कोटी ४७ लाख महिला लाभार्थी होत्या. यापैकी १ कोटी ६० लाख महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली असली, तरी उर्वरित ३० लाख महिलांनी अजूनही ही प्रक्रिया केलेली नाही. त्यामुळे शासनाने मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवली आहे. ही अंतिम मुदत असून, यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
- ई-केवायसी प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. लाभार्थी महिलांनी अधिकृत वेबसाइट https://ladakibahin.maharashtra.gov.in वर जाऊन आधार क्रमांक टाकावा, ओटीपीद्वारे प्रमाणीकरण करावे आणि आवश्यक माहिती भरावी. ही प्रक्रिया घरबसल्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून पूर्ण करता येते. मात्र, आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक आणि बँक खाते असणे आवश्यक आहे. तसेच, चुकीची माहिती भरल्यास 'वन टाइम एडिट'ची सुविधा ३१ डिसेंबरपर्यंत उपलब्ध आहे.