Bangladesh High Commission Protests Delhi : हिंदूंवरील अत्याचाराचे दिल्लीत तीव्र पडसाद; संतप्त हिंदू संघटनांचा बांगलादेशी उच्चायुक्तालयावर धडक मोर्चा

नवी दिल्ली : शेजारील देश बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या भीषण हिंसाचाराचे आणि हिंदू धर्मीयांना लक्ष्य केले जात असल्याच्या घटनांचे तीव्र पडसाद भारतात उमटत आहेत. बांगलादेशातील भारतीय दूतावासावर झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर आज दिल्लीत हिंदू संघटनांनी प्रचंड संताप व्यक्त केला. दिल्लीतील चाणक्यपुरी भागात असलेल्या बांगलादेश उच्चायुक्तालयावर (High Commission) विविध हिंदू संघटनांनी विराट मोर्चा काढला, ज्यामुळे राजधानीतील राजकीय वातावरण तापले आहे. बांगलादेशात हिंदूंची घरे, मंदिरे आणि आता थेट भारतीय दूतावासाच्या कार्यालयाला लक्ष्य केले जात असल्याच्या वृत्ताने देशभरात संतापाची लाट आहे. दिल्लीत जमलेल्या शेकडो आंदोलकांनी बांगलादेश सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहून पोलिसांनी तातडीने बॅरिकेड्स लावून मोर्चा अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये काही काळ झटापटही झाली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून उच्चायुक्तालयाबाहेरील सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली असून निमलष्करी दलाच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत.




मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेशात केवळ सामान्य हिंदू नागरिकच नाही, तर भारतीय राजनैतिक कार्यालयांनाही टार्गेट केले जात आहे. भारतीय दूतावासाच्या कार्यालयावर झालेल्या दगडफेकीमुळे भारत सरकारनेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. तिथे राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला असून, दिल्लीतील आंदोलकांनी याविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर दाद मागण्याची मागणी केली आहे. "बांगलादेशात हिंदूंवर होणारा अन्याय थांबवा," अशा आशयाचे फलक हातात घेऊन तरुण आणि महिला मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत. दिल्लीच्या सीमावर्ती भागात आणि संवेदनशील ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बांगलादेशातील अशांततेचा फटका तेथील भारतीय व्यवसायांना आणि दूतावासातील कर्मचाऱ्यांना बसत असल्याने भारतात राहणाऱ्या नागरिकांमध्ये चिंतेचे आणि रागाचे वातावरण आहे.



भारतीय उच्चायुक्तांना परराष्ट्र मंत्रालयाचे बोलावणे, अमेरिकेचेही लक्ष


बांगलादेशात हिंदू समुदायावर होत असलेले हल्ले आणि एका हिंदू तरुणाच्या हत्येनंतर निर्माण झालेला तणाव आता राजनैतिक स्तरावर पोहोचला आहे. दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर हिंदू संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर, मंगळवारी सकाळी भारताचे बांगलादेशातील उच्चायुक्त प्रणय वर्मा यांना परराष्ट्र मंत्रालयात तातडीच्या बैठकीसाठी बोलावण्यात आले. परराष्ट्र मंत्रालयातील या महत्त्वाच्या बैठकीत भारताचे उप उच्चायुक्तही उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतातील विविध शहरांमध्ये असलेल्या बांगलादेशी दूतावासांच्या सुरक्षेबाबत निर्माण झालेली चिंता आणि बांगलादेशातील सद्यस्थिती यावर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. बांगलादेशातील हिंसाचाराचे पडसाद भारतात उमटत असताना, दोन्ही देशांमधील राजनैतिक केंद्रांची सुरक्षा सुनिश्चित करणे हे सध्या सरकारपुढील मोठे आव्हान ठरत आहे. शनिवार रात्रीपासूनच दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने सुरू आहेत. सुरुवातीला ही निदर्शने शांततेत होती, मात्र हिंदू तरुणाच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर आंदोलक अधिकच आक्रमक झाले आहेत. पोलिसांनी परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला असला, तरी संतप्त कार्यकर्ते बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न करत आहेत.


"बांगलादेशात हिंदूंवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही," अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे. बांगलादेशातील या अस्थिरतेवर आता जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेनेही आपले बारीक लक्ष ठेवले आहे. बांगलादेशचे अंतरिम प्रमुख मुहम्मद युनूस यांनी अमेरिकेला तेथील परिस्थितीबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. आंतरराष्ट्रीय दबाव वाढत असतानाच, युनूस यांनी स्पष्ट केले आहे की, कोणत्याही परिस्थितीत बांगलादेशात फेब्रुवारी २०२६ मध्ये सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जातील. लोकशाही प्रक्रियेद्वारेच शांतता प्रस्थापित करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बांगलादेशातील छळाचे अनेक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओंमुळे भारतातील हिंदू संघटनांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे. परराष्ट्र मंत्रालयाने या निदर्शनांवर लक्ष ठेवले असून, बांगलादेश सरकारला तेथील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलण्याचे आवाहन वारंवार केले जात आहे. भारत देखील बांगलादेशातील सध्याच्या परिस्थितीमध्ये अलर्ट मोडवर आहे. भारताच्या शेजारी देशांमध्ये मोठी अस्थिरता सध्या बघायला मिळत आहे. बांगलादेशाने यापूर्वीच पाकिस्तानला हाताशी धरून थेट अमेरिकेचे पास पकडले आहेत. आता अमेरिका बांगलादेशातला नक्की किती साथ देते हे देखील बघण्यासारखे ठरणार आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये भारत आणि बांगलादेशचे संबंध तणावात असल्याचे दिसत आहे.

Comments
Add Comment

पोलिसांसमोर २२ नक्षलवादी आले शरण

मलकानगिरी : मलकानगिरी जिल्ह्यात ओडिशा पोलिसांसमोर २२ नक्षलवादी शरण आले. आपल्या हातातील शस्त्र टाकून माओवादी

एनआयए प्रमुख सदानंद दाते होणार महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत अतिरेकी हल्ला केला होता. या

Digital Fraud News : ८ कोटींची फसवणूक, १२ पानांची चिठ्ठी अन् स्वतःवर गोळी; माजी IPS अमर सिंग चहल यांचा आत्महत्येचा प्रयत्न

पटियाला : पंजाबमधील एक धक्कादायक घटना समोर आली असून, राज्याचे माजी आयपीएस (IPS) अधिकारी अमर सिंग चहल यांनी स्वतःवर

२०२५ मध्ये जनरेशन झेडने आणला पर्यटनाचा नवा ट्रेंड

प्रवास बुकिंगमध्ये वाढ; क्लीअरट्रिपचा वर्षअखेरीचा अहवाल नवी दिल्ली : २०२५ मध्ये भारतीयांच्या प्रवासाच्या सवयी

प्रदूषण प्रमाणपत्र नाही, तर पेट्रोल नाही…

राज्य सरकारचे पेट्रोल पंपांना कडक आदेश ओडिसा : भारतातील वाढत्या प्रदूषणावर उपाय म्हणून ओडिशा सरकारने महत्वाचा

अरावली पर्वतरांगेतील ९० टक्के क्षेत्र संरक्षित

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडून सरकारची भूमिका स्पष्ट नवी दिल्ली : राजस्थानमधील अरावली