जंतुसंसर्ग रोखण्यासाठी पालिका सज्ज
मुंबई : मुंबईतील पालिकेच्या सार्वजनिक रुग्णालयांमध्ये रुग्णांना होणारा संसर्ग रोखण्यासाठी ‘सूक्ष्मजंतुनाशक बेड मॅट’ वापरण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. या मॅटवर असलेले सूक्ष्मजंतुनाशक कोटिंग जंतूंची वाढ रोखण्यास मदत करते. तसेच, जलप्रतिबंधक थरामुळे रक्त, लघवी, घाम, स्त्राव यांसारखे संसर्गाचे प्रमुख वाहक थेट गादीपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे या मॅटबाबत विचारणा सुरू असून, त्यांचा खर्च, परिणामकारकता आणि अंमलबजावणी याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे.
आरोग्य विभागातील सूत्रांच्या माहितीनुसार, या विशेष मॅटमुळे रुग्णालयातील बेडवरून पसरणाऱ्या जंतू संसर्गाचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते. विशेषतः अतिदक्षता विभाग (आयसीयू), शस्त्रक्रियेनंतरचे वॉर्ड, भाजलेल्या रुग्णांचे विभाग तसेच दीर्घकाळ रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांसाठी हे मॅट उपयुक्त ठरू शकतात.
आरोग्यतज्ज्ञांच्या मते, योग्य ठिकाणी आणि योग्य प्रमाणात या मॅटचा वापर केल्यास त्याचा प्रत्यक्ष फायदा होऊ शकतो. मात्र, संपूर्ण प्रणालीमध्ये अंमलबजावणी करण्यापूर्वी पायलट प्रकल्प, खर्च-लाभ विश्लेषण आणि रुग्णांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचे शास्त्रीय मूल्यांकन करणे आवश्यक आहे. प्रशासनाकडून अंतिम निर्णय घेताना संसर्ग नियंत्रणाची गरज आणि सार्वजनिक निधीचा विवेकपूर्ण वापर या दोन्ही बाबींचा समतोल साधला जाईल, असे सांगण्यात आले. संसर्गाचे प्रमाण कमी झाल्यास रुग्णांचा उपचार कालावधी कमी होण्यासोबतच रुग्णालयातील एकूण स्वच्छतेच्या दर्जातही सुधारणा होऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच संसर्ग नियंत्रण प्रभावी ठरल्यास प्रतिजैविक औषधांचा वापर मर्यादित ठेवण्यास मदत होईल आणि त्यामुळे वाढत्या ‘प्रतिजैविक प्रतिकार’ला आळा घालण्यास हातभार लागेल, असेही काही आरोग्यतज्ज्ञांचे मत आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे प्रश्न
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. हे बेड मॅट सार्वजनिक रुग्णालयांच्या अर्थसंकल्पाला परवडणारे आहेत का?, एका मॅटची नेमकी किंमत किती आहे?, मंजूर निधीतून किती मॅट खरेदी करण्यात येणार आहेत?, तसेच कोणत्या रुग्णालयांना आणि कोणत्या विभागांना प्राधान्य दिले जाणार आहे?, याबाबत स्पष्ट धोरण असणे आवश्यक आहे. याशिवाय, हे मॅट वापरात आल्यानंतर रुग्णांना देण्यात येणाऱ्या प्रतिजैविक औषधांचे प्रमाण प्रत्यक्षात किती कमी होते, याचा शास्त्रीय अभ्यास होणे गरजेचे असल्यावरही भर देण्यात येत आहे.