मीरा भाईंदर शहरातील भाईंदर पश्चिम भागात उत्तन गावाच्या किनारपट्टीवर अथांग सागरी किनारा लाभला आहे. गावात कोळी आणि आगरी समाजाची बहुतांश नागरी वस्ती आहे. आणि मासेमारी हा त्यांचा मुख्य व्यवसाय असून तेच त्यांचे उपजीविकेचे साधन आहे. आहे. १२ सागरी मैल क्षेत्रात पारंपारिक पद्धतीने मासेमारी केली जाते तर खोल समुद्रात यांत्रिक पद्धतीने मासेमारी केली जाते. साधारण ७०० बोटी गावात आहेत.जीवाची पर्वा न करता डिझेल, बर्फ व इतर साहित्य घेऊन मासेमारी करणाऱ्या बोटी खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी जातात. मीरा भाईंदर मधून मोठया प्रमाणात मासे मुंबई व आजूबाजूच्या परिसरात विकले जातात. दरवर्षी शेकडो टन मासळी समुद्रातून काढली जाते. त्यामुळे या व्यवसायातून दरवर्षी हजारो कोटींची उलाढाल होत असते. तरी देखील मच्छीमारांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. शहरात अद्ययावत मासळी बाजार नाही, गावात सिटी सर्वे न झाल्यामुळे मूळच्या कोळी बांधवांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळावे अशी त्यांची मागणी आहे. शीतगृहातील अनुदानात वाढ होणे, डिझेल परतावा लवकर मिळणे, नैसर्गिक तेल आणि वायू सर्वेक्षण मासेमारी बंद असलेल्या कालावधीत करावी, बंधारा, जेट्टी अशा अनेक मागण्या कोळी बांधवांनी यावेळी केल्या. त्याला उत्तर देताना नितेश राणे यांनी सांगितले की या सर्व मागण्या माझ्या खात्यातील असल्याने त्या सोडवण्याची क्षमता आणि जबाबदारी माझ्याकडे आहे म्हणून मी आपल्यातील एक म्हणून आपल्याला आश्वासित करतो की या सर्व समस्या लवकरात लवकर सोडवण्यात येतील तसेच यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल. उत्तन वाहतूक सहकारी संस्था यांनी आयोजीत केलेल्या या बैठकीला आमदार नरेंद्र मेहता, रणवीर वाजपेयी तसेच पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कोळी बांधव आणि भगिनी उपस्थित होते.