रवींद्र चव्हाण, किसन कथोरे यांचे यशस्वी नेतृत्व
ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात भाजपने काल मोठा राजकीय धक्का दिला आहे. अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगर परिषदांमध्ये भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले असून, शिवसेना शिंदे गटाला नामुष्कीला सामोरे जावे लागले आहे. या दोन्ही नगर परिषदा श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात येतात. त्यामुळे याठिकाणी श्रीकांत शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. विशेषत: दोन्ही ठिकाणी सर्वाधिक जागा शिंदे गटाच्या असतानाही नगराध्यक्षपद भाजपकडे गेले आहे.
अंबरनाथ नगर परिषदेत भाजपच्या तेजश्री करंजुले यांनी शिवसेना शिंदे गटाच्या मनीषा वाळेकर यांचा सुमारे ६ हजार मतांनी पराभव केला. तर बदलापूरमध्ये भाजपच्या रुचिता घोरपडे यांनी शिंदे गटाच्या वीणा म्हात्रे यांचा तब्बल ७ हजार ६३४ मतांनी पराभव केला. या निकालामुळे ‘गड आला पण सिंह गेला’ अशी अवस्था शिंदे गटाची झाली आहे.
अंबरनाथमध्ये सून चालवणार सासऱ्याचा वारसा: अंबरनाथमध्ये २० वर्षांपूर्वी शिवसेनेचे नगराध्यक्ष राहिलेले गुलाबराव करंजुले यांचा राजकीय वारसा त्यांच्या सूनबाई तेजश्री करंजुले यांनी पुढे नेला आहे. भाजपने महायुतीची चर्चा सुरू असतानाच तेजश्री करंजुले यांना उमेदवारी देत शिंदे गटाला पहिला धक्का दिला होता.कॉंग्रेसची स्वबळावर मुसंडी: अंबरनाथमध्ये कॉंग्रेसने स्वबळावर लढत १२ जागा जिंकत आपले अस्तित्व ठळक केले. या निकालांनी ठाणे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीतील हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.
बदलापूरमध्ये घराणेशाही नाकारली:
बदलापूरमध्ये शिंदे गटाचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या कथित घराणेशाहीला मतदारांनी नकार दिला. एकाच कुटुंबातील सहा उमेदवार रिंगणात उतरविल्यामुळे नाराजी दिसून आली. विशेषतः शहरप्रमुख वामन म्हात्रे हे गेल्या २५ वर्षांपासून नगर परिषदेत सक्रिय असतान त्यांचा केवळ ३२ मतांनी निसटता विजय झाला, तर पत्नी, मुलगा आणि पुतण्याचा पराभव झाला.
कथोरे X म्हात्रे सामना :
बदलापूर शहरामध्ये भाजपच्या वतीने किसन कथोरे यांनी निवडणुकीची धुरा सांभाळली होती. तर शिवसेनेकडून वामन म्हात्रे यांनी शिवसेनेकडून मोर्चेबांधणी केली होती. वरिष्ठ नेत्यांकडून या निवडणुकीमध्ये लक्ष दिले जात असले तरी कथोरे आणि म्हात्रे अशी निवडणूक रंगली होती.
अंबरनाथमध्ये काँग्रेसचे पुनरुज्जीवन; १२ जागांवर मुसंडी
एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अंबरनाथ शहरात काही वर्षांत पक्षाची मोठी वाताहत झाली होती. शहरातील काँग्रेस ब्लॉक अध्यक्षांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने पक्षाला मोठा धक्का बसला होता. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर त्याच नेत्याने पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी केल्यानंतर पक्षसंघटना सावरण्याचे प्रयत्न सुरू झाले आणि त्याचे प्रतिबिंब अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीच्या निकालात दिसून आले. नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारात शिंदे गटाची शिवसेना आणि भाजप यांचाच जोर अधिक दिसून आला. मात्र या गर्दीतही काँग्रेसने आपला प्रचार सुरू ठेवत अंबरनाथ प. या भागावर लक्ष केंद्रित केले. या भागातील पारंपरिक मतांच्या जोरावर काँग्रेसला तब्बल १२ जागा मिळाल्या. शिंदेसेना आणि भाजपनंतर काँग्रेस तिसरा मोठा पक्ष ठरला आहे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार नूतन पाटील यांनीही २१ हजारांहून अधिक मते घेत लक्षणीय कामगिरी केली. नगराध्यक्षपद जिंकता न आले तरी अंबरनाथमध्ये कॉंग्रेसचा पारंपरिक मतदार अजूनही शाबूत असल्याचे स्पष्ट झाले आहे.