महापालिका निवडणूक प्रचाराचे अभिनव ‘फंडे’
मुंबई (प्रतिनिधी) : भाजपने लोकसभा-विधानसभेच्या निवडणुकाच नव्हे, तर महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचीही जय्यत तयारी केली असून प्रचारात नवनवीन ‘फंडे’ वापरायला सुरूवात केली आहे. विविध समाज, ज्ञाति, लोकलमधील भजनी मंडळांशी संपर्काबरोबरच आता मुंबईतील बूटपॉलिशवाल्यांना साद घातली आहे. शहरातील शेकडो बूटपॉलिशवाल्यांना भाजपने सोमवारी मुंबई भाजप कार्यालयात आमंत्रित केले आणि त्यांच्या अडीअडचणींवर मार्ग काढण्यात येणार आहे.
भाजपकडून कोणतीही निवडणूक अतिशय अटीतटीने लढविली जाते. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी तर कोणतीही कसर बाकी ठेवली जाणार नाही. त्यामुळे भाजपने माळी, भंडारी समाज यासह अनेक समाजांच्या मंडळांना साद घालत त्यांचे मेळावेही घेतले.
लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी आणि रोजच्या धकाधकीच्या जीवनात लोकलमध्येही भजनी मंडळे मोठ्या उत्साहाने भजनांचा ठेका धरतात. या मंडळांना प्रोत्साहन देत त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न भाजपने गेल्या आठवड्यात शनिवारी आयोजित मेळाव्यात करण्यात आला. त्याचबरोबर आता बूटपॉलिशवाल्यांशीही संपर्क साधण्यात येत आहे.
मुंबईतील प्रत्येक रेल्वेस्थानक व परिसरात हजारो बूटपॉलिश व्यावसायिक आहेत.
शहरात पार पडले ११० हळदीकुंकू समारंभ
भाजपने मुंबई महापालिका निवडणूक घोषित होण्याआधीच आचारसंहितेचा अडसर नको, यासाठी ११० प्रभागांमध्ये हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले होते. पुढील काळात घरोघरी जावून जनसंपर्काबरोबरच विविध स्वयंसेवी संस्था व अन्य माध्यमातून प्रचारमोहीम राबविण्याचे भाजपचे नियोजन आहे.