लोणावळ्यात महिलेचा फळविक्रेती ते नगरसेविकापर्यंतचा प्रवास

लोणावळा : लोणावळ्यातील फळविक्रेती भाग्यश्री जगताप यांच्यावर मतदारांनी मोठा विश्वास दाखवत त्यांना नगरसेविका म्हणून निवडून दिलं. साध्या कुटुंबातून राजकारणात आलेल्या भाग्यश्री यांचं भाग्य जरी उजळलं असलं, तरी सत्ता मिळाल्यानंतरही त्यांनी आपली मुळं विसरलेली नाहीत. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या २४ तासांतच भाग्यश्री पुन्हा फळांच्या गाडीवर परतल्या आणि त्यांच्या कामानं अनेकांना सुखद धक्का दिला.


गेल्या दहा वर्षांपासून फळ विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या भाग्यश्री जगताप यांना अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली होती. राजकारणाचा कोणताही अनुभव नसतानाही त्यांनी प्रचाराच्या रणधुमाळीत उतरून मतदारांशी थेट संवाद साधला. दिवसा फळ विक्री करत प्रचार आणि संध्याकाळी घरोघरी जाऊन मतदारांपर्यंत पोहोचत त्यांनी आपली लढत यशस्वी केली.


राज्यातील २८८ नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल २१ डिसेंबर २०२५ रोजी जाहीर झाला. या निवडणुकांमध्ये ११७ ठिकाणी नगराध्यक्ष आणि ११०० नगरसेवक निवडून आले. सर्वाधिक १२९ जागा भाजपला मिळाल्या, तर शिंदे गटाच्या शिवसेनेला ५१ आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ३३ जागांवर यश मिळालं.


या निवडणुकांत अनेक ठिकाणी प्रस्थापित नेत्यांच्या कुटुंबियांना उमेदवारी देण्यात आली असताना लोणावळ्यात मात्र एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. आदिवासी समाजातील जगताप कुटुंबातील भाग्यश्री यांना संधी देत मतदारांनी फळविक्रेतीवर विश्वास टाकला. नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतरही भाग्यश्री यांनी फळ विक्रीचा व्यवसाय सुरू ठेवला आहे. राजकारणात सत्ता मिळाल्यावर माणसं बदलतात हा समज खोडून काढत भाग्यश्री यांनी लोकशाहीचं सकारात्मक चित्र समाजासमोर ठेवलं आहे.


“दहा वर्षे ज्या व्यवसायानं आपलं पोट भरलं, तो व्यवसाय नगरसेविका झाले तरी सोडणार नाही. मतदारांनी जो विश्वास दाखवला आहे, तो सार्थ ठरवणं ही माझी जबाबदारी आहे,” असं भाग्यश्री जगताप यांनी सांगितलं. “माझ्या मतदारांची अपेक्षा आहे की मी नगरपरिषदेत काम करावं, पण माझा उदरनिर्वाह फळ विक्रीतूनच चालतो. त्यामुळे व्यवसाय आणि राजकारण या दोन्हींची सांगड घालत पुढे जाणार आहे,” असंही त्या म्हणाल्या.

Comments
Add Comment

धाराशिवमध्ये हिट अँड रन, ऊसतोड मजुरांना उडवले

धाराशिव : धाराशिवमधील कळंब लातूर रस्त्यावर हिट हिट अँड रनची घटना घडली. भरधाव वेगाने आलेल्या कारने ऊसतोड

Devendra Fadanvis : पाच वर्षांनंतरही राज्यात महायुतीच दिसणार; मुख्यमंत्री फडणवीसांना विश्वास

गोंदिया : राज्यात सध्या सुरू असलेल्या विविध राजकीय चर्चा आणि अफवांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

मुंबई-नागपूर महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

मुंबई : नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६ वर मलकापूरजवळ भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. या

मराठवाड्यात मविआला मोठा धक्का; परभणी-धाराशिवमध्ये महायुतीचा डंका

धाराशिव : राज्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मराठवाड्यातील परभणी आणि धाराशिव या दोन

Maharashtra Local Body Elections : "विरोधकांचे 'नरेटिव्ह' भुईसपाट..."; भाजपच्या ऐतिहासिक यशावर मुख्यमंत्री फडणवीसांची विरोधकांवर सणसणीत टोलेबाजी!

नागपूर : राज्यातील नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीच्या निकालांनी महाराष्ट्राचे राजकीय चित्र पुन्हा एकदा

मंचरमध्ये पडली समान मत; ईश्वर चिठ्ठीने निवडला नगरसेवक

मंचर : राज्यातील २८८ नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल रविवारी जाहीर झाले. मिनी विधानसभा म्हणून