नवी दिल्ली : कर्नाटक सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड लागू केला आहे. कार्यालयात फाटलेल्या जीन्स आणि स्लिव्हलेस कपडे घालण्यास मनाई आहे. या आदेशामागील कारण सरकारी कार्यालयांमध्ये प्रतिष्ठा राखणे असल्याचे सांगितले आहे. आदेशाचे पालन न केल्यास कारवाईचा धोका देखील आहे.
कर्नाटकातील कार्मिक व प्रशासकीय सुधारणा विभागाने कर्नाटक सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयीन शिस्तीबाबत एक कडक परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार, कर्मचाऱ्यांना फाटलेली जीन्स व स्लिव्हलेस कपडे घालण्यास मनाई आहे. हे सरकारी परिपत्रक विविध विभाग प्रमुख, जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री कार्यालय, अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी व इतरांना पाठवण्यात आले आहे. त्यात सरकारी कार्यालयांना भेट देण्याच्या काय आणि काय करू नये याची यादी आहे.
या परिपत्रकाबाबत सरकारने म्हटले आहे की, काही कर्मचारी राज्य सरकारी कार्यालयांमध्ये अश्लील कपडे घालून काम करत असल्याच्या तक्रारी जनतेकडून व काही संघटनांकडून विभागाला मिळाल्या होत्या. कर्मचाऱ्यांना योग्य कपडे घालण्याचे निर्देश देण्यात आले असले तरी, बरेच जण सूचनांचे पालन करत नाहीत. म्हणूनच हे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.