नवी दिल्ली : दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (IGI) टर्मिनल १ वर एका वैमानिकाने प्रवाशाला अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एअर इंडिया एक्सप्रेसच्या कॅप्टन वीरेंद्र सेजवाल यांनी अंकित देवान नावाच्या प्रवाशाला मारहाण करून रक्तबंबाळ केले. या घटनेची गंभीर दखल घेत केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने संबंधित वैमानिकाला तात्काळ सेवेतून हटवण्याचे (Ground) आदेश एअर इंडिया एक्सप्रेसला दिले आहेत.
मोहित सोमण: गो डिजिट जनरल इन्शुरन्स लिमिटेड (GDGIL) या भारतातील डिजिटल इन्शुरन्स सेवा कंपनीत तिच्याच होल्डिंग कंपनी असलेल्या गो डिजिट इन्फोवर्क्स ...
वादाचे नेमके कारण काय?
अंकित देवान हे आपल्या कुटुंबासह आणि ४ महिन्यांच्या लहान बाळासह प्रवास करत होते. बाळ आणि स्ट्रॉलर (लहान मुलाची गाडी) सोबत असल्याने विमानतळ कर्मचाऱ्यांनी त्यांना कर्मचारी आणि पीआरएम (PRM) सुरक्षा तपासणी विभागातून जाण्यास सांगितले. तिथे काही कर्मचारी रांग तोडून पुढे जात होते. अंकित यांनी यावर आक्षेप घेतला असता, तिथे उपस्थित असलेले पायलट वीरेंद्र सेजवाल यांनी त्यांना 'तू अडाणी (Anpadh) आहेस का? तुला बोर्ड वाचता येत नाही का?' असे म्हणत अपमानित केले. दोघांमधील शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. अंकित यांनी आरोप केला आहे की, पायलट वीरेंद्र यांनी संयम गमावला आणि त्यांना शारीरिक इजा केली. यामध्ये अंकित यांचे नाक फुटले आणि ते जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडले. अंकित यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यांच्या शर्टवर रक्ताचे डाग स्पष्ट दिसत आहेत. धक्कादायक म्हणजे, सुरक्षा तपासणीवेळी सीआयएसएफ (CISF) जवानासमोर पायलटने 'मी याला मारून येतो' असे म्हटले होते, तरीही जवानांनी त्याला रोखले नाही, असा आरोप अंकित यांच्या पत्नीने केला आहे.
मंत्रालय आणि एअरलाईन्सची कारवाई
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरी उड्डाण मंत्रालयाने कडक पावले उचलली आहेत. मंत्रालयाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी (BCAS) आणि सीआयएसएफ (CISF) कडून सविस्तर अहवाल मागवला आहे. एअर इंडिया एक्सप्रेसने या घटनेचा निषेध करत म्हटले आहे की, "आमचा कर्मचारी दुसऱ्या विमान कंपनीने प्रवास करत असताना ही घटना घडली आहे. आम्ही अशा वर्तनाचा तीव्र निषेध करतो. संबंधित वैमानिकाला तात्काळ कर्तव्यावरून हटवण्यात आले असून, अंतर्गत चौकशीनंतर पुढील कडक कारवाई केली जाईल."