मुंबई : सध्या पश्चिम बंगालमध्ये SIR मुद्द्यावरून तणावपूर्ण वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राज्य दौरा होत असल्याने राजकीय व प्रशासकीय पातळीवर विशेष हालचालींना वेग आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी २० डिसेंबर रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सकाळी सुमारे ११.१५ वाजता ते नादिया जिल्ह्यातील राणाघाट येथे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.
या दौऱ्यात पंतप्रधान सुमारे ३२०० कोटी रुपयांच्या दोन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. यामध्ये नादिया जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३४ वरील ६६.७ किलोमीटर लांबीच्या बाराजागुली ते कृष्णनगर या मार्गाच्या चौपदरीकरणाचा समावेश आहे.
तसेच उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३४ वरील १७.६ किलोमीटर लांबीच्या बारासात ते बाराजागुली या मार्गाच्या चौपदरीकरणाची पायाभरणीही पंतप्रधान मोदी करणार आहेत.
हे दोन्ही प्रकल्प कोलकाता आणि सिलीगुडी यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहेत. या महामार्गांमुळे प्रवासाचा वेळ सुमारे दोन तासांनी कमी होण्याची शक्यता असून वाहतुकीचा प्रवाह अधिक सुरळीत होणार आहे. त्यामुळे वाहनांचा परिचालन खर्च कमी होण्यास मदत होईल तसेच कोलकाता, पश्चिम बंगालमधील इतर जिल्हे आणि शेजारील देशांशी संपर्क अधिक मजबूत होणार आहे.
या प्रकल्पांमुळे परिसरातील आर्थिक विकासाला चालना मिळणार असून पर्यटन क्षेत्रालाही मोठी गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.