खेड : खेड–मंडणगड मार्गावर एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड–मंडणगड मार्गावरील भिलारे–आयनी गावाजवळ गुरुवारी (१८ डिसेंबर) दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. मंडणगडहून खेडकडे येणाऱ्या एसटी बस आणि खेडकडून दुचाकीवर जात असलेल्या विलास कोरपे (रा. आयनी, चव्हाणवाडी) यांची समोरासमोर जोरदार धडक झाली.
धडक इतकी तीव्र होती की विलास कोरपे यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. अपघाताची माहिती मिळताच स्वामी नरेंद्र महाराज संस्थेची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली; मात्र तोपर्यंत विलास कोरपे यांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती. घटनेची नोंद संबंधित पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.