मंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार गस्ती मोहीम; तीन नौकांवर कठोर कारवाई
मुंबई : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत अनधिकृत ‘एलईडी’ मासेमारी करणाऱ्यांना मत्स्यव्यवसाय विभागाने दणका दिला आहे. मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार राबवलेल्या विशेष गस्ती मोहिमेत रायगड जिल्ह्यातील तीन नौका जप्त करण्यात आल्या असून, त्यावरील एलईडी मासेमारीचे सर्व साहित्यही विभागाने ताब्यात घेतले आहे.
रायगड जिल्ह्यातील सागरी भागात अनधिकृत एलईडी पद्धतीने मासेमारी करणाऱ्या नौकांवर मत्स्यव्यवसाय विभागाने १७ आणि १८ डिसेंबर रोजी रात्री आणि सकाळी धाडी घातल्या. १७ डिसेंबर रोजी रात्री ९:३० वाजता केलेल्या पहिल्या कारवाईत जगन्नाथ कोळी यांच्या मालकीची ‘साई गणेश’ ही नौका अनधिकृत एलईडी पद्धतीने मासेमारी करताना विभागाच्या गस्ती नौकेने पकडली. त्याच दिवशी रात्री ११ वाजता अलिबागलगत यशवंत नाखवा यांची ‘हेरंब कृपा’ ही नौका अनधिकृत एलईडी लाइट्स वापरून मासेमारी करताना आढळली आणि तीही जप्त करण्यात आली.
तिसरी कारवाई १८ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता उरण तालुक्यातील तुकाराम पाटील यांच्या ‘श्रीसमर्थ कृपा’ या नौकेवर करण्यात आली. विभागाच्या गस्ती नौकेने तपासणी केली असता या नौकेत मोठ्या प्रमाणात अनधिकृत एलईडी साहित्य आढळले. या कारवाईत ४ हजार वॅटचे अंडर वॉटर एलईडी लाइट्स, १ हजार वॅटचे सीया लाइट्स, ४०० वॅटचे हॅलोजन बल्ब आणि जनरेटर असे साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई सहआयुक्त (सागरी) महेश देवरे, प्रादेशिक उपायुक्त मत्स्यव्यवसाय मुंबई नागनाथ भादुले, परवाना अधिकारी ससून गोदी, परवाना अधिकारी करंजा, परवाना अधिकारी मिरकरवाडा (रत्नागिरी) आणि परवाना अधिकारी साखरीनाटे (रत्नागिरी) यांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आली.