ठाणे : ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्याच्या कामाअंतर्गत ठाण्याच्या लॉन्चिंग शाफ्ट येथे 'नायक' नावाच्या टनेल बोअरिंग मशीनच्या (टीबीएम) जोडणीचे काम सुरू आहे. टीबीएमची जोडणी पूर्ण करून मार्च २०२६ मध्ये ठाण्याकडून बोरिवलीच्या दिशेने भुयारीकरणाच्या कामाला सुरुवात करण्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) नियोजन आहे.
या दुहेरी बोगद्याचे काम मे २०२८ पर्यंत पूर्ण करून हा बोगदा वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे. हा बोगदा वाहतूक सेवेत दाखल झाल्यास ठाणे ते बोरिवली अंतर केवळ १२ मिनिटांत पार करता येणार आहे. दुहेरी बोगद्याच्या कामासाठी चार टीबीएम यंत्रांचा वापर करण्यात येणार असून या टीबीएमची बांधणी चेन्नईतील ‘हेरेनकनेट’ कंपनीत केली जात आहे.
यापैकी दोन टीबीएम मुंबईत दाखल झाले असून पहिल्या टीबीएमचे नाव 'नायक' आहे. नायक' टीबीएम ठाण्यातून बोरिवलीच्या दिशेने भुयारीकरण करणार आहे. या टीबीएमच्या जोडणीचे काम सध्या ठाणे लॉन्चिंग शाफ्ट येथे सुरू आहे. ही जोडणी पूर्ण करून मार्च २०२६ मध्ये भुयारीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. अंदाजे ११० सुट्ट्या भागांमध्ये टीबीएम आणण्यात आले असून सुट्ट्या भागांची जोडणी झाल्यानंतर ते भूगर्भात सोडण्यात येणार आहेत.
दुसऱ्या टीबीएमचे नाव 'अर्जुन' असून हे टीबीएम बोरिवलीच्या लाॅन्चिंग शाफ्टमध्ये सोडण्यात येणार आहे. बोरिवली आणि ठाणे प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी एमएमआरडीएने एकूण सहा मार्गिकांचा ११.८ किमी लांबीचा ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प हाती घेतला. यात १०.२५ किमी लांबीचे दोन बोगदे असणार असून हे बोगदे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणार आहेत. हा प्रकल्पासाठी अंदाजे १८ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून हा प्रकल्प पूर्ण होऊन प्रवासी वाहतुकीस खुला झाल्यास ठाणे-बोरिवली अंतर केवळ १२ मिनिटांत पार करता येणार आहे. यामुळे ठाणे, बोरिवलीतील वाहतूक कोंडी दूर होणार आहे.