नवी मुंबई: बेलापूर/नेरूळ–उरण मार्गावरील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. बेलापूर/नेरूळ–उरण मार्गावर पाच अतिरिक्त रेल्वे फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. काही दिवसांपूर्वी याबाबत रेल्वे प्रशासनाने आश्वासन दिले होते. अतिरिक्त रेल्वे सेवेमुळे बेलापूर/नेरूळ–उरण मार्गावरील प्रवाशांना गर्दीच्या प्रवासापासून दिलासा मिळणार आहे. या नवीन गाड्या आणि विस्तारित वेळेमुळे प्रवाशांचा प्रवास आता जलद आणि अधिक सोयीचा होणार आहे.
रेल्वेच्या या अतिरिक्त सेवेतील महत्त्वाची गोष्ट म्हणजे अतिरिक्त गाड्यांसोबतच, या मार्गावर दोन नवी रेल्वे स्थानकं सुरू करण्यात येणार आहेत. ज्यात तारघर आणि गव्हाण या दोन स्थानकांचा समावेश आहे. यापैकी तारघर हे महत्त्वाचे स्थानक समजले जाते. कारण तारघर स्थानक थेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळ आहे. त्यामुळे विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही मोठी सोय ठरणार आहे. या निर्णायाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचे मन:पूर्वक आभार मानले आहेत.
शिवसेनेला विधानसभेत खाते खोलण्याची संधी मुंबई (सचिन धानजी): मागील पाच ते सहा निवडणुकांमध्ये चेंबूरमधील एकाच प्रभागातून सातत्याने चंद्रकांत हंडोरे ...
रेल्वेच्या या अतिरिक्त सेवेमुळे बेलापूर/नेरूळ–उरण मार्गावर आता एकूण ५० गाड्या धावणार आहेत. ज्यासाठी १०० कोटी खर्च करण्यात आला आहे. नव्या लोकल गाड्यांमुळे लोकलचे वेळापत्रक बदलले जाणार आहे. त्यानुसार आता उरण मार्गावर प्रवाशांना रात्री उशिरापर्यंत सेवा मिळणार आहे. उरणहून पहिली ट्रेन सकाळी ५ वाजून ३५ मिनिटांनी तर शेवटची रेल्वे रात्री १० वाजून ५ मिनिटांनी सुटणार आहे. तर बेलापूरहून शेवटची रेल्वे रात्री १० वाजून १५ मिनिटांनी सुटणार आहे.