गोंदिया : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नक्षलवाद्यांना शरण या नाही तर मरा असा निर्वाणीचा इशारा दिला आहे. अमित शाह यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद्यांचा पुरता बीमोड करण्यासाठी सुरक्षा यंत्रणांना निर्देश दिले आहे. गृहमंत्र्यांकडून परवानगी मिळाल्यापासून सुरक्षा यंत्रणांनी आक्रमक होत नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले आहे. सरकारी यंत्रणेचा हा आक्रमक पवित्रा बघून घाबरलेल्या नक्षलवाद्यांनी शरणागती स्वीकारण्यास सुरुवात केली आहे.
महाराष्ट्रात गोंदिया जिल्ह्यात तीन मोठ्या नक्षलवाद्यांची शरणागती स्वीकारली आहे. यामुळे राज्यातल्या नक्षलवाद्यांच्या कारवाया थंडावण्याची शक्यता वाढली आहे. शरण आलेले तिन्ही नक्षलवादी दरेकसा एरिया कमिटीचे सदस्य होते. विदर्भात मध्यप्रदेश आणि छत्तीसगडला लागून असलेल्या राज्याच्या सीमा भागातील नक्षलवादी कारवायांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. सरकारच्या नक्षलवाद विरोधी मोहिमेला यश मिळू लागल्याचे चित्र आहे.
दरेकसा एरिया कमिटी कमांडर रोशन बेडजा (३५) याच्यासह सुभाष रव्वा (२६) आणि रतन पोयाम (२५) गोंदिया पोलिसांसमोर शरण आले आहेत. मागील काही महिन्यांपासून नक्षलवादी हातातील शस्त्र खाली टाकून आणि हातात भारतीय संविधानाची प्रत घेऊन शरण येऊ लागले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत अलिकडेच नक्षलवादी भूपती, तारक्का यांनी आत्मसमर्पण केले. याआधी ११ नक्षलवादी शरण आले होते.