Sunday, January 18, 2026

‘शंकर जयकिशन’ची तालीम थेट हैदराबादला!

‘शंकर जयकिशन’ची तालीम थेट हैदराबादला!

मराठी रंगभूमीवर लवकरच दाखल होणाऱ्या सुरज पारसनीस दिग्दर्शित ‘शंकर जयकिशन’ या नाटकाची तालीम थेट हैदराबादला होतेय. साधारणत: नाटकांच्या तालमी या मुंबई-पुण्यात किंवा कलाकारांच्या उपलब्धतेनुसार महाराष्ट्रातच होतात; परंतु हे ऐकून नाटकप्रेमींसुद्धा आश्चर्यचकित झाले आहेत.

नाटकातील मुख्य भूमिका साकारत असलेले महेश मांजरेकर सध्या एका महत्त्वाच्या दाक्षिणात्य चित्रपटाचे चित्रीकरण हैदराबादमध्ये करत आहेत. चित्रपटाचे शूटिंग आणि नाटकाची तालीम या दोन्ही गोष्टी एकत्र सांभाळताना नाटकावर परिणाम व्हायला नको, या विचारातून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता नाटकाची टीम काही दिवसांपासून हैदराबादमध्येच मुक्काम करून आहे. महेश मांजरेकर सध्या अक्षरशः डबलशिफ्टमध्ये काम करत असून दिवसा दाक्षिणात्य चित्रपटाचे शूटिंग आणि संध्याकाळपासून ‘शंकर जयकिशन’ नाटकाची तालीम चालू आहे. त्यांच्या काम करण्याच्या वेगाने आणि समर्पणाने संपूर्ण टीमलाच नवसंजीवनी मिळाली आहे. त्यांचा डेडिकेशन पाहून तिथे उपस्थित टीमलादेखील प्रचंड प्रेरणा मिळत असल्याचं समजतं. भरत जाधव यांच्यासह संपूर्ण तांत्रिक आणि कलात्मक मंडळींच्या सहकार्यामुळे नाटक अधिक दमदार व्हावं, यासाठी सर्वजण मनापासून प्रयत्न करत आहेत. भरत जाधव एण्टरटेन्मेंट निर्मित सुरज पारसनीस दिग्दर्शित या नाटकाचे लेखन विराजस कुलकर्णी याने केले आहे. क्षितिज पटवर्धन यांचे गीत आणि अजित परब यांचे संगीत लाभलेल्या या नाटकात शिवानी रांगोळे, भरत जाधव आणि महेश मांजरेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विनोद, भावना आणि नात्यांचे सुंदर मिश्रण असलेल्या ‘शंकर-जयकिशन’ या नाटकाचा शुभारंभ १९ डिसेंबर रोजी विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे होणार आहे.

Comments
Add Comment