नागपूर : गेल्या दोन दिवसांपासून विधानसभेत मंत्री आाणि संबंधित विभागांचे सचिव उपस्थित नसल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित होत असताना, शुक्रवारी भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनाही असाच अनुभव आला. मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून आणि घरकुल योजनेच्या रखडलेल्या निधीवरून मुनगंटीवार यांनी सभागृहात आक्रमक होत सरकारला धारेवर धरले. ‘सभागृहात मंत्री येत नसतील, तर त्यांच्यावर बिबटे सोडा, हे धंदे आता बंद करा’, अशा शब्दांत मुनगंटीवार यांनी आपला संताप व्यक्त केला.
विधानसभेत सभागृहात अर्धा तास चर्चा सत्रात मुनगंटीवार बोलण्यासाठी उभे राहिले असता संबंधित विभागाचे मंत्री सभागृहात उपस्थित नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावरून त्यांचा पारा चढला. त्यांनी तालिका अध्यक्षांना सुनावले की, मंत्री महोदयांना सभागृहात आणण्याचे दायित्व आमचे नसून ते तुमचे आहे. आमदार उपस्थित असतांना मंत्री अनुपस्थित रहातात. हे आता चालणार नाही, असे ते म्हणाले.
भारत माता माझी आई, डोके ठेवायला जागा नाही!
चंद्रपूर जिल्ह्यातील ‘यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने’च्या विमुक्त जाती आणि भटक्या जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना घरकुलाचे लाभ देण्यावरून रखडलेल्या निधीवरून मुनगंटीवार अधिकच आक्रमक झाले. ‘भारत माता माझी आई; पण डोक ठेवायला जागा नाही’, अशी गरिबांची अवस्था झाली आहे. मुंबईत असलेल्यांसाठी सरकारकडे ११ लाख कोटी रुपये आहेत; पण आमच्या चंद्रपूरमधील तुटक्या-फुटक्या घरात रहाणार्या गरिबांसाठी लागणारे ९६ कोटी ३६ लाख रुपये मिळत नाहीत. ज्या अधिकार्यांमुळे ही परिस्थिती ओढवली आहे, त्यांनी कोरड्या विहिरीत जीव दिला पाहिजे, अशा तिखट शब्दांत त्यांनी टीका केली.
बिरबलाची खिचडी शिजेल; पण तुमचा निधी येणार नाही!
सरकारच्या कारभारावर टीका करतांना मुनगंटीवार म्हणाले की, या योजनेचा एक हप्ता मिळाल्यावर दुसर्या हप्त्यासाठी गरिबांना चातक पक्ष्याहून अधिक वाट पहावी लागते. कापूसकोंड्याची गोष्ट संपेल, बिरबलाची खिचडी शिजेल, चिऊताई दरवाजा उघडेल; पण तुमचा निधी काही येत नाही. अधिकार्यांनी लिहून दिलेली उत्तरे वाचू नका, तर निधी कधी देणार ते स्पष्ट सांगा, असा थेट जाब त्यांनी मंत्री अतुल सावे यांना विचारला.
चंद्रपूरला १०० टक्के निधी त्वरित देऊ - मंत्री अतुल सावे
आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी परखड शब्दांमध्ये घरकुल योजनेविषयीची आपली तक्रार मांडल्यानंतर ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी ‘निधी लवकरात लवकर दिला जाईल’, असे आश्वासन दिले. ते म्हणाले की, पुरवणी मागण्यांमध्ये या योजनेसाठी ३०० कोटी रुपये संमत झाले आहेत. चंद्रपूरला विहीत १०० टक्के निधी त्वरित दिला जाईल. आपण नवीन घरकुल ‘पंतप्रधान आवास योजने’च्या माध्यमातून देत आहोत; पण आधीच्या घरकुल योजनेसाठी आपण ३०० कोटी रुपयांची व्यवस्था केली आहे. त्वरित त्यावर कार्यवाही होईल, असे उत्तर त्यांनी दिले.






