इस्लामाबाद : पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत एक अजब घटना घडली. या घटनेवर हसावे की पाकिस्तानच्या खासदारांच्या वर्तनाची कीव करावी असा प्रश्न निर्माण झाला आहे. सभापती अय्याज सादीक यांनी सभागृहात उपस्थित सदस्यांना काही नोटांच्या स्वरुपात रोख रक्कम दाखवली. हे पैसे कोणाचे असा प्रश्न सादीक यांनी सभागृहाला विचारला. सभापतींच्या हातात मोठी रोख रक्कम बघून अनेक खासदारांनी लगेच हात वर केले. रोख रकमेवर दावा सांगितला. हा प्रकार बघून सादिक म्हणाले, जेवढ्या नोटा आहेत त्या पेक्षा जास्त हात वर आले आहेत. यामुळे पैसे कोणालाही देत नाही, माझ्या ताब्यात ठेवतो... हे सांगितल्यानंतर सादीक यांनी नोटा आपल्या ताब्यात ठेवल्या. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर आला तेव्हा तो लगेच व्हायरलही झाला.
सभापतींना सभागृहात १० पाकिस्तानी नोटा सापडल्या. त्यांनी या नोटा उचलून खासदारांना दाखवल्या आणि विचारले.... या कोणाच्या आहेत? ज्याचे हे पैसे आहेत त्यांनी हात वर करा. सभापतींनी प्रश्न विचारताच अनेक खासदारांनी एकदम हात वर केला. अखेर सभापतींनी कोणालाही न देता नोटा स्वतःच्या ताब्यातच ठेवल्या. सभापती गमतीने म्हणाले - 'फक्त १० नोटा आहेत आणि मालक १२ आहेत. सभापतींच्या वक्तव्यानंतर सभागृहात हास्याचा स्फोट झाला.