नागपूर : राज्यात आगामी महानगरपालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले असतानाच, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्या संभाव्य युतीबाबत आज एक मोठी राजकीय घडामोड घडणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आज रात्री नऊ वाजता मुंबईत एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत प्रामुख्याने मुंबई, ठाणे आणि राज्यातील इतर काही महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये शिवसेना-भाजप युतीने एकत्र निवडणूक लढायची की नाही, यावर सविस्तर चर्चा होणार आहे. दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये जागावाटप आणि युतीच्या फॉर्म्युल्यावर सखोल विचारमंथन होण्याची शक्यता आहे.
नवी मुंबईबाबत आज काय ठरणार?
या बैठकीच्या केंद्रस्थानी नवी मुंबई महानगरपालिका असणार आहे. नवी मुंबईत दोन्ही पक्षांचे प्राबल्य असल्याने, या शहरात युतीचा नेमका पॅटर्न काय असेल आणि नेतृत्व कोणाकडे असेल, यावर आजच्या चर्चेत काही ठोस निर्णय घेतला जातो का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
अमित शहांच्या भेटीनंतर बैठकीला महत्त्व
या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, कारण कालच (बुधवारी) भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. शहा यांच्या भेटीनंतर लगेचच चव्हाण आणि उपमुख्यमंत्री शिंदे हे युती संदर्भात एकत्र चर्चा करत असल्याने, या बैठकीत युतीच्या अंतिम निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. या बैठकीनंतर दोन्ही पक्षांकडून युतीबाबत अधिकृत घोषणा केली जाते की नाही, यावर राज्यातील महानगरपालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.