निरगुडसर : बिबट्यांना पकडण्यासाठी आंबेगाव तालुक्यातील मंचर वनक्षेत्रात असलेल्या चार परिमंडळातील एकूण ५५ गावांपैकी ३० गावांत ५१ पिंजरे वनविभागाने तैनात केले आहेत. त्यामध्ये निरगुडसर, गावडेवाडी, अवसरी बुद्रुक, अवसरी खुर्द, मंचर, वडगाव काशिंबेग, खडकी, पिंपळगाव ही गावे बिबट्यांची हॉटस्पॉट केंद्र बनली आहेत. आठ गावातच २५ पिंजरे बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी बसवण्यात आले आहेत. ' या वनपरिक्षेत्रात ५५ गावे येत असून या भागात सर्वाधिक असलेला ऊसपट्टयात बिबट्या दबा धरून बसतो. घोडनदी आणि मीनानदी पात्र जवळ असल्याने पिण्यासाठी पाणी आणि सावज शेताच्या बांधाजवळच मिळत असल्याने बिबट्यांचे प्रमाण वाढले आहे. मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले म्हणाले की, ''मंचर वनपरिक्षेत्रात एकूण ५५ गावे येतात, यामध्ये बिबट्यांची संख्या मोठी आहे. यापूर्वीच ५५ गावांसाठी अवघे २० पिंजरे होते त्यामुळे पिंजरे लावण्यात अडचणी येत होत्या. सरकारकडून नव्याने ३६ पिंजरे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.