नागपूर : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील इंदिरा नगर भागात सर्वे नंबर १०६ मधील सुमारे ६० ते ६५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ७०० नागरिकांच्या 'पोकळी हिस्से' नोंदीचा प्रश्न तातडीने मार्गी लावला आहे. आमदार सत्यजित तांबे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केलेल्या या गंभीर प्रश्नाची दखल घेत, अरेरावी करणाऱ्या उपनिबंधक (सब-रजिस्ट्रार) अधिकाऱ्यावर त्वरित कारवाईचे आदेश देण्यात आले.
आमदार सत्यजित तांबे यांनी केलेल्या तक्रारीनुसार, संगमनेर येथील उपनिबंधक कार्यालयातील जाधव नावाचे अधिकारी नागरिकांशी अरेरावीने वागत होते आणि कायदेशीर नोंदी करण्यासाठी टाळाटाळ करत होते. महसूल मंत्री बावनकुळे यांनी सभागृहात सांगितले की, "त्या अधिकाऱ्याची (जाधव) आजच बदली केली जाईल."नोंदणी महानिरीक्षक (IGR - Inspector General of Registration) स्वतः तीन दिवसांत संगमनेर येथे जातील आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी करतील. चौकशी अहवालानंतर जाधव यांच्यावरील निलंबनासह इतर कारवाई करण्याचा निर्णय घेतला जाईल. अधिकाऱ्याने दस्त लावण्यासाठी टाळाटाळ केली असल्यास किंवा चुकीच्या पद्धतीने वागले असल्यास त्याची नोंद घेतली जाईल.
जवळपास ७०० नागरिकांचे दस्त नोंदणीसाठी प्रलंबित असल्याने आणि एकाच दिवशी एवढी मोठी कामे कार्यालयाच्या मनुष्यबळासाठी शक्य नसल्यामुळे, महसूल मंत्र्यांनी विशेष उपाययोजना जाहीर केली. ७०० दस्तनोंदणीचे काम पूर्ण करण्यासाठी तीन दिवसांचा विशेष कॅम्प लावण्यात येईल.दुय्यम निबंधक कार्यालयाला अतिरिक्त मनुष्यबळ पुरवले जाईल, जेणेकरून सर्व नागरिकांचे काम जलद गतीने पूर्ण होईल. आयजीआर स्वतः या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी संगमनेरला उपस्थित राहतील असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
मंत्री महोदयांनी दिलेल्या सकारात्मक आणि तातडीच्या उत्तरावर आमदार सत्यजित तांबे यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी महसूल मंत्र्यांचे आभार मानले, कारण हे प्रश्न ५० ते ३०० चौरस फुटांच्या छोट्या घरांशी संबंधित होते, ज्यामुळे अनेक वर्षांपासून नागरिकांना मालमत्तेचा हक्क मिळत नव्हता.मंत्री बावनकुळे यांनी पहिल्या दिवसापासून दाखवलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे हा प्रश्न मार्गी लागल्याचे तांबे यांनी नमूद केले.