नागपूर : राज्यात एफ.एल–२ आणि सी.एल–३ परवानाधारक विदेशी व देशी दारू किरकोळ विक्री केंद्रांच्या स्थलांतरासाठी नोंदणीकृत सोसायटीची एनओसी अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री व उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली.
आमदार शंकर जगताप यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. पवार म्हणाले की, संबंधित दुकान सोसायटी परिसरात असेल तर सोसायटीची संमती नसल्यास स्थलांतरास कोणतीही परवानगी दिली जाणार नाही. एफएल–२ आणि सीएल–३ परवान्यांबाबत ही अट आता काटेकोरपणे लागू राहील. पिंपरी-चिंचवड येथील कोळीवाडा आणि रहाटणीतील दोन अनधिकृत दारू दुकाने निलंबित करण्यात आल्याचेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. यापैकी एक प्रकरण न्यायालयात प्रलंबित असून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई केली जाईल, तर एका दुकानावर यापूर्वी रुपये ५० हजार रुपये दंड आकारण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.