पुणे: देशभरातील मुस्लीम महिलांच्या जीवनात अस्थिरता निर्माण करणाऱ्या बहुपत्नीत्व प्रथेला तातडीने कायदेशीर बंदी घालावी, अशी मागणी भारतीय मुस्लीम महिला आंदोलन (बीएमएमए)या संघटनेने केंद्र सरकारकडे केली आहे. सात राज्यांमध्ये घेतलेल्या विस्तृत सर्वेक्षण अहवालाच्या निष्कर्षांवर आधारलेल्या या मागणीला देशभरातील ३०० हून अधिक प्रतिनिधींचा पाठिंबा मिळाला आहे. या सर्वेक्षणातून मिळालेल्या आकडेवारीतून मुस्लीम महिलांची स्थिती किती गंभीर आहे, हे स्पष्ट झाल्याचे नमूद केले आहे. बहुपत्नीकत्वामुळे ६९ टक्के महिला प्रचंड मानसिक तणावाखाली, ७९ टक्के महिलांना पतीच्या दुसऱ्या लग्नाची माहिती वेळेवर मिळाली नाही, ४८ टक्के महिलांना शिक्षणाचा अभाव असल्याचे आढळले आहे.