केंद्र सरकारचा हेतू वंदे मातरमचा इतिहास, स्वातंत्र्यलढ्यातील त्याची भूमिका आणि त्याची सांस्कृतिक आणि राष्ट्रीय प्रासंगिकता यावर चर्चा करणे हा आहे. शिवाय, १९३७ मध्ये काँग्रेस पक्षाने काढून टाकलेल्या काही ओळींवरून मुख्य विरोधी पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान मोदी मागील काही दिवसांपासून वंदे मातरमवरून काँग्रेस पक्षावर सतत टीका करत आहेत. वंदे मातरम संदर्भातल्या एका कार्यक्रमात मोदी म्हणाले की, १९३७ मध्ये काँग्रेसने वंदे मातरम मोडून देशाच्या फाळणीचे बीज पेरले. पंतप्रधानांनी याला काँग्रेसचे तुष्टीकरणाचे धोरण म्हटले. म्हणूनच, आज जेव्हा या मुद्द्यावर चर्चा होईल तेव्हा दोन्ही बाजू एकमेकांवर तीव्र राजकीय हल्ले करताना दिसण्याची शक्यता आहे. याआधी १ ऑक्टोबर २०२५ रोजी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्रिमंडळाने स्वातंत्र्यलढ्यातील ऐतिहासिक भूमिकेला लक्षात घेऊन 'वंदे मातरम्' या राष्ट्रीय गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त देशभरात उत्सव साजरे करण्यास मंजुरी दिली.