जिल्हा परिषदेच्या ५७ गटातील मतदारांचा समावेश
पालघर : मतदार याद्यांमधील दुबार नावावरून सर्वत्र राजकीय वातावरण तापले असताना, पालघर जिल्ह्यातील ५७ जिल्हा परिषद गटांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदारयाद्या मध्ये सुद्धा २९ हजार ७७० मतदारांची नावे दुबार असल्याचे समोर आले आहे. त्या अानुषंगाने राज्य निवडणूक आयोग आणि शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मतदारांच्या दुबार नावाबाबत प्रशासनाकडून कार्यवाही सुरू आहे.
पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ५७ गट आणि पंचायत समितीच्या ११४ गणासाठी राखीव जागा आणि महिला आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. तसेच आगामी निवडणुकीसाठी मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या सुद्धा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी एकूण १२ लाख २२ हजार ९१३ मतदार आहेत. यापैकी ६ लाख १० हजार ९०८ पुरुष मतदार असून, ६ लाख ११ हजार ९४९ महिला मतदारांचा समावेश आहे. यामध्ये जवळपास ३० हजार मतदारांची नावे दुबार आहेत. दरम्यान, पालघर जिल्हा परिषदेच्या एकूण ५७ जागा असून , यापैकी ३७ जागा या अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गाच्या सदस्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर नागरिकांच्या मागास प्रवर्ग (ओबीसी)साठी १५ आणि अनुसूचित जाती प्रवर्ग (एसटी) साठी १ जागा राखीव ठेवण्यात आली आहे.
या जिल्हा परिषदेत सर्वसाधारण प्रवर्गासाठी केवळ ४ जागा शिल्लक आहेत. त्यामुळे एकूण ५७ जागांपैकी ५३ जागा या राखीव झाल्या असून, राखीव जागांचे आरक्षण ९३ टक्क्यांवर गेले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आता राखीव जागांची आरक्षण मर्यादा एकूण जागांच्या ५० टक्के मर्यादेत ठेवावी लागणार आहे. परिणामी, पालघर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राखीव जागांचे आरक्षण नव्याने काढणे हाच पर्याय आयोग आणि शासनासमोर आहे. एकंदरीतच पालघर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात येणाऱ्या जागांची संख्या ही आता २९ च्यावर
असणार नाही.
त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर्वसाधारण जागा मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. प्रभागांचे आरक्षण बदलणार असले तरी, जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणासाठी मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.त्यामुळे मतदार याद्यांमध्ये कोणताही बदल होणार नाही. मतदार यादीमध्ये दुबार नाव असलेल्या मतदारांकडून एकाच ठिकाणी मतदान करणार असल्याबाबत हमीपत्र लिहून घेण्यात येणार आहे. परिणामी अशा मतदारांचा शोध प्रशासनाकडून घेतल्या जात आहे.
नव्या आरक्षणामुळे अनेकांच्या आशा पल्लवीत
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेले राजकीय आरक्षण ५० टक्क्यांवर गेले असल्याने, या ठिकाणी नव्याने आरक्षण काढण्यात येणार आहे. जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणामध्ये जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सभापतींसह अनेक दिग्गज सदस्यांचे निवडणुकीची तयारी असलेले गट हातून गेले होते. काही ठिकाणी प्रवर्गाची तर काही ठिकाणी महिला आरक्षणाची अडचण अनेक माजी पदाधिकाऱ्यांना निर्माण झाली होती. आता राखीव जागांचे आरक्षण आणि पर्यायाने महिला आरक्षण बदलणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या आवडीच्या गटात निवडणूक लढायला मिळेल या आशेने काही माजी पदाधिकाऱ्यांनी पूर्वीच्याच गटात निवडणुकीची तयारी चालवली आहे.