मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर स्थानकाच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही ‘दादर स्टेशनचे चैत्यभूमी स्टेशन’ असे नामकरण करण्याची मागणी पुढे आली आहे. या वेळी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ नरेंद्र जाधव यांनी दादर मेट्रो स्थानकाला ‘चैत्यभूमी’ हे नाव देण्याची औपचारिक मागणी केली आहे.
नरेंद्र जाधव यांनी आज सकाळी चैत्यभूमीवर उपस्थित राहून बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखोंच्या संख्येने अनुयायी मुंबईत आले असून यावर्षीही १५ ते २० लाख लोकांच्या उपस्थितीची शक्यता आहे. चैत्यभूमी परिसरात पुस्तकांचे मोठे प्रदर्शन भरले असून सुमारे चार कोटी रुपयांची विक्री होणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
मुंबई महानगरपालिकेने केलेल्या व्यवस्थेचे कौतुक करताना नरेंद्र जाधव यांनी इंदू मिल येथील आंबेडकर स्मारकाचे काम वेगाने करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने समन्वय समिती स्थापन करावी, अशी मागणी केली. तसेच आंबेडकरी जनतेच्या वतीने दादर मेट्रो स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याची मागणी त्यांनी केली.
नरेंद्र जाधव यांच्या मागणीवर सत्ताधारी तसेच विरोधकांकडूनही सकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रस्तावाचे स्वागत केले आणि गेल्या अनेक वर्षांपासून दादर स्थानकाच्या नामांतराचा मुद्दा प्रलंबित असल्याची आठवण करून दिली. तर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही चैत्यभूमीवर उपस्थित राहून बाबासाहेबांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि नरेंद्र जाधव यांनी केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री सकारात्मक निर्णय देतील, असा विश्वास व्यक्त केला.