मुंबई : विधानसभा निवडणुकीत वरळीची जागा कशीबशी जिंकलेल्या शिउबाठाला अद्याप राजकीय स्थितीचे भान आलेले दिसत नाही. वरळीतील एका खासगी हॉटेलमध्ये भाजपप्रणित युनियनचा फलक लावण्यावरून शिउबाठाच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी राडा घातला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत, कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
वरळीतील हॉटेल सेंट रेजिसमध्ये भाजपने आपली कामगार संघटना स्थापन केली असून, त्याबाबतचा फलक लावण्याचे काम शुक्रवारी सुरू होते. मात्र, शिउबाठाच्या कार्यकर्त्यांना दादागिरी करीत, फलक लावण्यास विरोध केला. भाजपच्या कार्यकर्त्यांनीही त्याला जशासतसे उत्तर दिल्यामुळे हॉटेलच्या परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करावा लागला.
याविषयी माहिती देताना स्थानिक पदाधिकारी समीर कदम म्हणाले, “आमच्या युनियनचा बोर्ड लावण्याकरिता आम्ही तेथे जमलो होतो. कामगारांचा युनियनशी चांगला संपर्क राहील आणि त्यांच्या न्याय हक्कांसाठी आम्हालाही आवाज उठवता येईल, हा त्यामागचा हेतू होता. मात्र, शिउबाठाच्या काही कार्यकर्त्यांनी उगाच गोंधळ घालायला सुरवात केली. भाजपने कोणतीही संघर्षाची भूमिका घेतलेली नाही”, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांनी दिला कारवाईचा इशारा
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. याविषयी छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले, “सगळ्यांना कामगार युनियनमध्ये त्यांच्या त्यांच्या मनाप्रमाणे काम करण्याचा पूर्ण हक्क आहे. संविधानानुसार सगळ्यांना मनाप्रमाणे काम करू द्यावे”, असे त्यांनी स्पष्ट केले.