सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद
मुंबई : लहान वयात आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या मुलांच्या नशीबात अतिशय हालाखीचे दिवस येतात. शिक्षण आणि रोजगार दूरच, ही मुले कायमस्वरुपी प्रवाहाबाहेर फेकली जातात. ही बाब गंभीरपणे विचारात घेऊन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि. १७ जानेवारी २०१८ रोजी अनाथांना शिक्षण आणि नोकरीत एक टक्का समांतर आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला. असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले. या ऐतिहासिक निर्णयामुळे आतापर्यंत ८०० हून अधिक अनाथ मुले शासकीय सेवेत दाखल झाली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी आपल्या तिसऱ्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळाची पहिली वर्षपूर्ती अनाथ मुलांसोबत साजरी करत, त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला.
यानिमित्ताने वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी ‘कृतज्ञतेचा आनंद’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. राज्यभरातून आलेल्या अनाथ लाभार्थी मुला-मुलींसोबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी जवळून संवाद साधला. या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “मुख्यमंत्रीपदाची तिसऱ्यांदा शपथ घेऊन आज एक वर्ष पूर्ण झाले. वर्षपूर्तीच्या निमित्ताने अनेक चांगले कार्यक्रम आयोजित केले, पण सगळ्यात जास्त आनंद या मुलांसोबत साजरा करताना येतोय. निःशब्द भाव खूप काही बोलून जातो. कार्यातून समाजपरिवर्तन घडवणे, हेच खरे समाधान आहे”, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

या कार्यक्रमाला उपस्थित अनाथ लाभार्थ्यांनी आपल्या यशोगाथा आणि संघर्षकथा मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. अनेकांनी ही योजना आपल्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरल्याचे सांगितले. यावेळी तर्पण फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आमदार श्रीकांत भारतीय, भाजपाचे प्रवक्ते अजित चव्हाण उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेवटी सर्वांना शुभेच्छा देत, अनाथ मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.
बाबासाहेबांच्या तत्त्वावर आधारित निर्णय
- मुख्यमंत्री म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संधीची समानता या तत्त्वावर आधारित हा ऐतिहासिक निर्णय आहे. या एका निर्णयामुळे आज ८०० हून अधिक अनाथ तरुण-तरुणी शासकीय सेवेत दाखल झाले आहेत. हे सामाजिक न्यायाच्या दिशेने उचललेलं अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे.”
- छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दाखला देत ते म्हणाले, “व्यक्तीपेक्षा तिचं कार्य जास्त काळ जिवंत राहतं. या दोन्ही महापुरुषांनी आपल्या कर्तृत्वाने कायमस्वरूपी वारसा निर्माण केला. आपणही आपल्या कामातून अशी वारसा उभा करूया”, असे आवाहन त्यांनी केले.
- “समाजाने आपल्याला खूप काही दिले आहे. ते समाजालाच परत करणे, हे खरे उत्तरदायित्व आहे. अनाथांसाठी सहवेदना, संवेदनशीलता आणि सातत्याने योगदान द्या. थांबू नका, सतत पुढे जात राहा”, असेही त्यांनी सांगितले.