नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील धोरणात्मक मैत्रीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या आणि दिल्लीत होत असलेल्या २३ व्या शिखर परिषदेच्या बैठकीच्या निमित्ताने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. पुतिन आणि मोदी यांच्यात हैदराबाद हाऊस येथे झालेल्या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदींनी हशतवादापासून ते युक्रेनमधील शांततेपर्यंतच्या मुद्द्यांवर चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी रशियाच्या नागरिकांना तीस दिवसांचा विनामूल्य पर्यटन व्हिसा देणार असल्याचेही जाहीर केले. ई टुरिस्ट व्हिसा आणि ग्रुप टुरिस्ट व्हिसा अशा दोन प्रकारात रशियाच्या नागरिकांना तीस दिवसांचा विनामूल्य पर्यटन व्हिसा मिळेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. रशिया भारतातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प बांधण्यासाठी सहकार्य करत असल्याची माहिती मोदींनी दिली.
मोदींनी सांगितलेले सात महत्त्वाचे मुद्दे
- भारत आणि रशिया यांच्यातील धोरणात्मक मैत्रीला २५ वर्षे पूर्ण. पुतिन यांच्या विशेष प्रयत्नांमुळे या मैत्रीत सातत्य राहिले आणि विश्वासार्हता वृद्धिंगत झाली.
- जगाने अनेकच-उतार बघितले पण भारत आणि रशियाची मैत्री ध्रुव ताऱ्यासारखी राहिली.
- भारत-रशिया दरम्यान २०३० पर्यंतच्या आर्थिक सहकार्यासाठी विशेष करार
- पुतिन आणि मोदी इंडिया रशिया बिझनेस फोरमला मार्गदर्शन करणार
- अलीकडेच दोन नवीन रशियन-भारतीय वाणिज्य दूतावास उघडण्यात आले आहेत, यामुळे तुमची जवळीक वाढेल. या वर्षी ऑक्टोबरमध्ये लाखो यात्रेकरूंनी काल्मिकियामध्ये भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांना भेट दिली. आता भारत रशियाच्या नागरिकांना तीस दिवसांचा विनामूल्य पर्यटन व्हिसा देणार. ई टुरिस्ट व्हिसा आणि ग्रुप टुरिस्ट व्हिसा अशा दोन प्रकारात रशियाच्या नागरिकांना तीस दिवसांचा विनामूल्य पर्यटन व्हिसा मिळेल.
- भारताने सुरुवातीपासूनच युक्रेन मुद्द्यावर शांततेचा पुरस्कार केला आहे. या प्रकरणाच्या शांततापूर्ण आणि कायमस्वरूपी तोडग्यासाठी केल्या जाणाऱ्या सर्व प्रयत्नांचे आम्ही स्वागत करतो.
- दहशतवादाविरुद्धच्या लढाईत रशियाने सहकार्य केले आहे. पहलगाम असो किंवा क्रोकस सिटी हॉलवरील हल्ला असो, या सर्वांचे मूळ एकच आहे. दहशतवाद हा मानवतेच्या मूल्यांवर थेट हल्ला आहे आणि यामध्ये जागतिक एकता ही आपली ताकद आहे.
पुतिननी सांगितलेले सात महत्त्वाचे मुद्दे
- रशिया आणि भारत यांच्यातील परस्पर संबंध खूप मजबूत आहेत. विविध क्षेत्रात एकमेकांना पुरेपूर सहकार्य सुरू आहे.
- ट्रेन, गुंतवणूक आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढीसाठी चर्चा सुरू आहे
- तेल आणि वायू क्षेत्रात रशिया आणि भारत एकमेकांना गरज ओळखून सहकार्य करत आहे
- रशियामध्ये भारतीय चित्रपट खूप लोकप्रिय आहेत. रुपयाच्या वापराची व्याप्ती देखील वाढली आहे.
- ब्रिक्स देशांसोबतचे भारत आणि रशियाचे सहकार्य सर्वांना पूरक आणि विकासाला चालना देणारे असे आहे.व्यापार आणि तंत्रज्ञान क्षेत्रात प्राधान्याने सहकार्य वाढत आहे.
- रशिया भारताला देशातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प बांधण्यासाठी सहकार्य करत आहे. आतापर्यंत तीन अणुभट्ट्या ऊर्जा जाळ्याशी जोडल्या आहेत. आणखी चार भट्ट्यांचे काम सुरू आहे. या अणुभट्ट्यांमुळे भारताच्या औद्योगिक क्षेत्राला तसेच नागरी वस्त्यांना स्वच्छ ऊर्जा मिळेल.
- रशिया आणि भारत ब्रिक्स, एससीओ आणि इतर आंतरराष्ट्रीय मंचांवर इतर देशांमधील समान विचारसरणीच्या देशांसह स्वतंत्र आणि स्वावलंबी परराष्ट्र धोरण राबवत आहेत... आम्ही संयुक्त राष्ट्रांमध्ये समाविष्ट असलेल्या कायद्याच्या राज्याच्या मुख्य तत्त्वाचे रक्षण करत आहोत.
भारत आणि रशिया यांच्यातील महत्त्वाचे सहकार्य करार
- भारत आणि रशिया यांच्यात कामगार सहकार्य करार
- भारत आणि रशियातील नागरिकांच्या एकमेकांच्या देशात होणाऱ्या स्थलांतरातून निर्माण होणारे प्रश्न हाताळण्यासाठीचा करार
- भारत आणि रशिया यांच्यात आरोग्य सेवा, वैद्यकीय शिक्षण आणि विज्ञान क्षेत्रातील सहकार्यासाठी करार
- अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण आणि अन्न सुरक्षिततेच्या क्षेत्रात ग्राहक हक्क संरक्षण आणि मानवी कल्याणावरील देखरेखीसाठी भारत आणि रशिया दरम्यान सहकार्य करार
- ध्रुवीय पाण्यात कार्यरत जहाजांवरील तज्ज्ञांच्या प्रशिक्षणासाठी करार
- खतांसाठी भारत आणि रशियाचा सहकार्य करार
- मालवाहतूक आणि आयात - निर्यातीवरील करांसाठी भारत आणि रशियाच्या संबंधित कर वसुली विभागांचा सहकार्य करार
- भारत आणि रशियात टपाल आणि दूरसंचार क्षेत्रात सहकार्य करार
- डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी, पुणे आणि फेडरल स्टेट ऑटोनॉमस एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन ऑफ हायर एज्युकेशन "नॅशनल टॉम्स्क स्टेट युनिव्हर्सिटी" यांच्यात वैज्ञानिक आणि शैक्षणिक सहकार्याचा करार
- मुंबई विद्यापीठ, लोमोनोसोव्ह मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटी आणि जॉइंट-स्टॉक कंपनी मॅनेजमेंट कंपनी ऑफ रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड यांच्यात सहकार्याबाबत टॉम्स्क करार
- प्रसार भारती, भारत आणि जॉइंट स्टॉक कंपनी गॅझप्रॉम-मीडिया होल्डिंग, रशियन फेडरेशन यांच्यातील प्रसारणावर सहकार्य आणि सहकार्यासाठी सामंजस्य करार.
- प्रसार भारती, भारत आणि नॅशनल मीडिया ग्रुप, रशिया यांच्यातील प्रसारणावर सहकार्य आणि सहकार्यासाठी सामंजस्य करार
- प्रसार भारती, भारत आणि बिग एशिया मीडिया ग्रुप यांच्यातील प्रसारणावर सहकार्य आणि सहकार्यासाठी सामंजस्य करार
- प्रसार भारती, भारत आणि एएनओ "टीव्ही-नोवोस्ती" यांच्यातील प्रसारणावर सहकार्य आणि सहकार्यासाठी सामंजस्य कराराची परिशिष्ट
- "टीव्ही ब्रिक्स" संयुक्त स्टॉक कंपनी आणि "प्रसार भारती (पीबी)" यांच्यातील सामंजस्य करार भारताच्या धोरणात्मक क्षेत्रांच्या विकासासाठी कार्यक्रम - रशिया २०३० पर्यंत आर्थिक सहकार्याची
- रशियन बाजूने आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स (आयबीसीए) मध्ये सामील होण्यासाठी फ्रेमवर्क करार स्वीकारण्याचा निर्णय
- राष्ट्रीय हस्तकला संग्रहालय आणि हस्तकला अकादमी (नवी दिल्ली, भारत) आणि त्सारित्सिनो राज्य ऐतिहासिक, वास्तुकला, कला आणि लँडस्केप संग्रहालय-रिझर्व्ह (मॉस्को, रशिया) यांच्यातील "इंडिया. फॅब्रिक ऑफ टाइम" या प्रदर्शनासाठी करार
- रशियन नागरिकांना परस्पर आधारावर ३० दिवसांचा ई-टूरिस्ट व्हिसा मोफत देणे आणि रशियन नागरिकांना मोफत समूह पर्यटक व्हिसा देणे