नवी दिल्ली : इंडिगो कंपनीने अचाकन आपल्या फ्लाईट रद्द केल्याने देशातील विविध महत्त्वाच्या विमानतळाची अवस्था बस स्टँडसारखी झाली असून, प्रवाशांची मोठी गर्दी विमानतळावर पाहायला मिळत आहे. इंडिगाने पत्रक जारी करत प्रवाशांची माफी देखील मागितली. मात्र, अचानक विमानसेवा खंडीत झाल्याने पुणे, मुंबई, कोलकाता, दिल्ली, बंगळुरू येथील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. या विमातळावरुन दुसरीकडे मार्गस्थ होणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. त्यातच, पुण्याहून मुंबई, दिल्ली आणि बंगळुरूला जाणाऱ्या विमानांच्या तिकिटांचे दर गगनाला भिडल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे ते मुंबई विमान प्रवास करण्यासाठी तब्बल ६१ हजार रुपये प्रवाशांना मोजावे लागले. या वाढीनुसार, पुणे ते दिल्ली विमानाचे तिकीट २७ हजार आणि पुण्याहून बंगळुरूसाठी ४९ हजार रुपये प्रवाशांना मोजावे लागले.दरम्यान, मुंबईहून लंडनला जाण्यासाठी किमान प्रिमियम इकॉनॉमीचे तिकीट ५० हजार ते ७० हजार रुपयांपर्यंत आहेत. तर, मुंबईहून थायलंडसाठी १५ ते ३० हजार रुपयांपर्यंत विमान भाडे आकारले जाते. मात्र, इंडिगोच्या विस्कळीत विमानसेवेमुळे पुणे ते मुंबई विमानाचे तिकीट चक्क ६१ हजार रुपयांपर्यंत पोहोचले.
सलग चौथ्या दिवशी इंडिगो कंपनीला ऑपरेशनल समस्यांशी गंभीरपणे झुंजावे लागत असून प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसत आहे. विमान उड्डाणाची संख्या कमी झाल्यामुळे इतर विमान कंपन्यांची तिकिटे मात्र चौपट दराने विकली जात आहेत. देशभरातून इंडिगोची तब्बल ६०० हून अधिक विमाने शुक्रवारी रद्द करण्यात आली आहेत. त्यामध्ये राजधानी दिल्लीतून आज रात्री ११.५९ वाजेपर्यंत इंडिगोचे एकही विमान उड्डाण होणार नाही, असे निवेदन कंपनीने जारी केले.
दरम्यान, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) विमान कंपन्यांना घालून दिलेल्या नवीन नियमांमुळे इंडिगो या देशातील सर्वात मोठ्या विमान वाहतूक कंपनीला मोठा फटका बसला आहे. या कंपनीची वाहतूक सेवा पूर्णपणे कोलमडून पडली. नवीन ‘फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन’च्या (एफडीटीएल) नियमांमुळे कर्मचाऱ्यांची (क्रू) कमतरता निर्माण झाली आहे. मात्र, आता डीजीसीएने एफडीटीएलशी संबंधित सर्व निर्देश मागे घेतले. त्यामुळे आता इंडिगोसह देशभरातील विमान वाहतूक कंपन्यांची सेवा सुरळीत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.