मुंबई : महापालिका निवडणुकीच्या मतदारयाद्या अचूक असाव्यात, यासाठी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सर्व महापालिका आयुक्तांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. तक्रार येण्याची वाट न पाहता यादीतील चुका स्वतःहून शोधून दुरुस्त करा, दुबार मतदारांची नावे काळजीपूर्वक तपासा आणि मतदानाच्या दिवशीही याबाबत दक्ष राहा, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.
गुरुवारी सर्व महापालिका आयुक्तांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन वाघमारे यांनी हे निर्देश दिले. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यावेळी उपस्थित होते. आयुक्त वाघमारे यांनी स्पष्ट केले की, दुबार नाव असलेला मतदार एकदा मतदान केंद्र निवडल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी मतदान करू शकणार नाही. यामुळे निवडणुकीत गोंधळ आणि गैरप्रकार टाळता येतील.
दरम्यान, सचिव सुरेश काकाणी यांनी सांगितले की, महापालिका निवडणुकीसाठी विधानसभेची मूळ मतदारयादीच वापरली जाते. फक्त तिचे प्रभागनिहाय विभाजन केले जाते. त्यात मतदारांचे नाव-पत्ता बदलले जात नाहीत. यंदा दि. १ जुलै २०२५ ही पात्रतेची तारीख (क्वालिफायिंग डेट) निश्चित करण्यात आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आता दहा डिसेंबरला येणार अंतिम यादी
- प्रारूप मतदारयादीवर आलेल्या हरकती आणि सूचनांची तातडीने पडताळणी करून १० डिसेंबर २०२५ पर्यंत अंतिम यादी प्रसिद्ध करावी.
- दुबार नावांचा कसून शोध घ्यावा. अशी नावे महापालिकेने आपल्या सूचना फलकावर आणि वेबसाइटवर जाहीर करावीत.
- ज्या मतदारांची नावे दोन ठिकाणी (**) चिन्हासह दिसत आहेत, त्यांना कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करायचे आहे हे विचारावे आणि अर्ज भरून घ्यावा.
- अर्ज केले नाही तर मतदानाच्या दिवशी मतदाराकडून हमीपत्र लिहून घेऊन, ओळख पडताळल्यानंतरच मतदानाची परवानगी द्यावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत.