नवी मुंबई : नवी मुंबईतून १ जानेवारी ते २९ नोव्हेंबर २०२५ या ११ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ४९९ मुले-मुली बेपत्ता झाल्याची नोंद नवी मुंबई पोलिसांनी केली आहे. यात ३४९ मुली व १५० मुले आहेत. ४५८ जणांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. ४१ जणं अद्यापही असुरक्षित आहेत. त्यात ३४ मुलींचा समावेश आहे. वाढलेल्या प्रकरणांमुळे मुलींची सुरक्षा धोक्यात आली आहे. या बेपत्ता मुलींमध्ये १५ ते १८ वयोगटातील मुला-मुलींचे प्रमाण जास्त आहे असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. सोशल मिडीया, कुटुंबातील विसंवाद ही यामागील कारणे असल्याचे मत व्यक्त होत आहे.
अनेक केसेसमध्ये मुलांना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. तर ४१ मुला-मुलींचा अध्याप शोध लागलेला नाही. यातील २५ गुन्हे पोक्सो अंतर्गत नोंद झालेले आहेत त्यामुळे ही प्रकरणे गंभीर मानली जातात. पालकांसाठी पोलिसांकडून विशेष जनजागृती मोहीम राबवली जात आहे. मुलांच्या वागणुकीत बदल, त्यांचे ऑनलाईन राहणे, अनोळखी व्यक्तींसोबत मैत्री याकडे लक्ष देण्याचे आवाहन पोलीस करतात. याबद्दल विविध शाळा-महाविद्यालयांमध्येही जनजागृती केली जात असल्याची माहिती व.पो.नि.पृथ्वीराज घोरपडे, मानव तस्करी प्रतिबंधक कक्ष यांनी दिली.
१ जानेवारी ते २९ नोव्हेंबर २०२५ या काळात येथील विविध पोलिस ठाण्यांतून बेपत्ता मुला-मुलींच्या नोंदींमध्ये सर्वाधिक आकडे तुर्भे पोलीस ठाण्यातील (५१) आहेत. त्यापाठोपाठ रबाळे (४९), रबाळे एमआयडीसी (४१), पनवेल शहर (३९), खारघर (३३), तळोजा (३१), कोपरखैरणे (३२), एनआरआय (३०) यांशिवाय कामोठे (२२), खांदेश्वर (२०), नेरुळ (१८), एपीएमसी (१९) या भागांसह इतर भागातीही लक्षणीय प्रकरणे नोंदली गेली आहेत.