मुंबई : राज्याच्या विद्यमान पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या येत्या ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत असून, त्यांचे उत्तराधिकारी म्हणून १९९० बॅचचे ज्येष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद दाते (Sadanand Date) यांची नियुक्ती जवळपास निश्चित मानली जात आहे. दाते सध्या राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) महासंचालक म्हणून केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत. त्यांना कार्यमुक्त करून महाराष्ट्रात परत पाठवावे, यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे औपचारिक प्रस्ताव पाठवला आहे.
पोलीस महासंचालक पदासाठी संजय वर्मा, रितेश कुमार (गृहरक्षक दल), संजीव कुमार सिंगल (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), अर्चना त्यागी (पोलीस गृहनिर्माण), संजीव कुमार (नागरी संरक्षण) आणि प्रशांत बुरडे (रेल्वे पोलीस) यांचीही नावे चर्चेत आहेत. मात्र सेवाज्येष्ठतेनुसार १९९० बॅचचे अधिकारी सदानंद दाते यांचे नाव निश्चित मानले जात आहे.
७०० इमारतींच्या खालून भुयार खणणार मुंबई : भुयारी मेट्रोमुळे सोपा झालेला मुंबईकरांचा प्रवास आणखी वेगवान होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra ...
कडक शिस्तेचे अधिकारी अशी ओळख असणाऱ्या सदानंद दाते यांनी मुंबई गुन्हे शाखेचे सहआयुक्त, राज्य दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात कामा रुग्णालय परिसरात लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी अजमल कसाब आणि अबू इस्माइल यांच्याशी थेट सामना करताना दाते गंभीर जखमी झाले होते. या कामगिरीबद्दल त्यांना राष्ट्रपती पोलीस गॅलंट्री पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.
तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणात महत्त्वाची भूमिका
३१ मार्च २०२४ पासून एनआयएचे महासंचालक म्हणून कार्यरत असलेल्या दाते यांनी तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पण प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावली होती. रत्नागिरी येथून पोलीस कारकीर्दीला सुरुवात करणाऱ्या दाते यांचा महाराष्ट्र पोलीस दलात ३५ वर्षांहून अधिक अनुभव आहे. त्यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत असल्याने नवे डीजीपी म्हणून त्यांना पूर्ण एक वर्षाचा कालावधी मिळणार आहे.