मुंबई : कर्करोगाचे वाढते प्रमाण व कर्करोग उपचाराचे गांभीर्य विचारात घेता राज्यातील जनतेस सर्वसमावेशक कर्करोग सेवा राज्य शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या सूचनेनुसार ‘आसाम कॅन्सर केअर मॉडेलच्या’ धर्तीवर राज्यात त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा एल 1, एल 2, एल 3 उपलब्ध होणार आहेत. एल 1 या स्तरामध्ये टाटा स्मारक रूग्णालय ही कर्करोगाकरिता शिखर संस्था म्हणून काम करणार आहे. एल 2, एल 3 या स्तरावर असणाऱ्या या रूग्णालयात कर्करोगासंबधित प्रशिक्षण मनुष्यबळ निर्माण करणे तसेच या आजाराविषयी संशोधन कार्यात प्रगती करण्यात येणार आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने याबाबत धोरण निश्चित केले आहे. जिल्हास्तरावर सुरू होणाऱ्या उपचारामुळे अनेक कर्करोगग्रस्त रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांचा वेळ वाचणार असून स्थानिक जिल्ह्यातच आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असल्याने या रूग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्यात त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा उपलब्ध होणार आहेत. L1 मध्ये टाटा स्मारक रूग्णालय ही कर्करोगाकरिता शिखर संस्था म्हणून काम करणार आहे. एल 2 या स्तरावरती कायमस्वरूपी संपूर्ण कर्करोग शिक्षण व सेवा असेल यामध्ये छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, नागपूर, मुंबई (जे.जे.), कोल्हापूर, पुणे (बैरामजी जिजीभॉय शासकीय महाविद्यालय), नांदेड येथील सात शासकीय महाविद्यालयांशी संलग्नित रूग्णालये, नाशिक व अमरावती येथील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारितील दोन संदर्भ सेवा रूग्णालयांचा यामध्ये समावेश आहे. अशी नऊ केंद्रे एल 2 मध्ये समाविष्ट आहेत. एल 3 यास्तरामध्ये मध्ये कर्करोग निदान आणि डे-केअर रेडिओथेरिपी व किमोथेरिपी युनिटस यामध्ये कार्यरत असणार आहेत. अंबाजोगाई (बीड), यवतमाळ, मुंबई (कामा व आल्ब्लेस रूग्णालय), सातारा, बारामती, जळगाव व रत्नागिरी येथील शासकीय महाविद्यालयांशी संलग्नित सात रूग्णालये, ठाणे जिल्हा रूग्णालय संलग्नित व शिर्डी संस्थानचे रूग्णालय अशी एकूण नऊ केंद्रे एल 3 म्हणून कार्यरत होतील. एल 2 स्तरामध्ये व एल 3 स्तरामध्ये एकूण अठरा रूग्णालये कार्यरत असतील. एल 3 स्तरावरील कर्करोग रूग्णालयांचे बांधकाम शासनामार्फत होऊन ही रूग्णालये सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर उभारण्यात येतील मात्र, या रूग्णालयावर शासनाचे सर्व नियंत्रण असेल.
एल २ व एल ३ स्तरावरील आरोग्य संस्थांना आवश्यकतेनुत्तार मनुष्यबळ उपलब्ध करुन देणे, संस्थांचे व्यवस्थापन करणे, पीपीपी धोरण राबविणे तसेच इतर अनुषंगिक बाबी पार पाडणे इ. बाबींकरिता मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कंपनी कायदा, २०१३ मधील सेक्शन-८ अंतर्गत महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फांउडेशन” महाकेअर फांउडेशन (MAHACARE Foundation) ही कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार संबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना निमंत्रित सदस्य म्हणून समाविष्ट करण्यात येईल. त्रिस्तरीय कर्करोग सेवा देणाऱ्या या संस्थाच्या योग्य समन्वयासाठी सिंगल क्लाऊड कमांड आणि कंट्रोल असेल. एल 2 स्तर रुग्णालयामध्ये कर्करोगासंबधी पदव्युत्तर व अतिविशेषोपचार शिक्षण एमडी, एएस, डीएम, एमसीएच, डीएनबी फेलोशिप उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात येत आहे. रुग्णसंख्या व शैक्षणिक बाबी यांसाठी भविष्यातील मागणी विचारात घेता एल 2 स्तरावरील संस्थांचे रूपांतर एल 1 संस्थेत करणे तसेच भविष्यात या संस्थांच्या संख्येत वाढ देखील करण्यात येणार आहे.
महाकेअर फाऊंडेशनला दैनंदिन भागभांडवल म्हणून सुरुवातीला १०० कोटी रूपये इतका निधी ‘कॉर्पस फंड’ म्हणून राज्य शासनामार्फत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतर्गत दुर्धर आजारासाठी उभारण्यात येणाऱ्या २० टक्के राखीव निधीतून (Corpus fund) उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत कर्करोग रुग्णालयास प्राप्त होणाऱ्या शुल्कापैकी २० टक्के शुल्क महाकेअर फाऊंडेशनला देण्यात येईल. या फाऊंडेशनला क्लिनिकल ट्रायल्स मधून निधीची उभारणी करता येईल, आशियाई विकास बैंक, जपान इंटरनॅशनल को ऑपरेशन एजन्सी, जागतिक बैंक तसेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अशा आंतरराष्ट्रीय संस्थांमार्फत तसेच देणग्या, अनुदाने, सीएसआर अंतर्गत देखील निधी शासनाच्या मान्यतेने मिळवता येवू शकेल. आवश्यकता भासल्यास जपान इंटरनॅशनल को ऑपरेशन एजन्सी, आशियाई विकास बँकेमार्फत राज्य शासनात्त प्राप्त होणा-या कर्जातून विहित प्रक्रियेद्वारे निधी उपलब्ध करून घेता येईल.