ईव्हीएमसह अधिकारी - कर्मचारी केंद्रांकडे रवाना
कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी उद्या (२ डिसेंबर) मतदान होणार असून त्यासाठीची सर्व पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनसह आवश्यक साहित्य आणि अधिकारी-कर्मचारी आज ( सोमवारी ) संबंधित केंद्रांकडे रवाना झाले.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांनी मतदान पथकांना मार्गदर्शन केले. यावेळी नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील उपस्थित होत्या.
कणकवलीत एकूण १७ मतदान केंद्रांवर उद्या मतदान होणार असून अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस यांच्यासह सुमारे १६२ जणांची तैनाती करण्यात आली आहे. नगरपंचायतीचे १७ प्रभाग असून प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र मतदान केंद्र ठेवण्यात आले आहे.
प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी आणि एक पोलीस कर्मचारी तैनात असणार आहे. याशिवाय २० कर्मचारी राखीव दल म्हणून ठेवण्यात आले आहेत. तसेच तीन क्षेत्रीय अधिकारी आणि एक राखीव अधिकारीही नियुक्त करण्यात आले आहेत.
ईव्हीएम मशीन आणि आवश्यक निवडणूक साहित्य आज (१ डिसेंबर) सकाळी १० वाजल्यापासून संबंधित मतदान केंद्रांकडे पाठविण्यात आले. उद्याच्या मतदानासाठी सर्व तयारी पूर्ण असून शांततेत व सुरळीत मतदान पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.