नाशिक (प्रतिनिधी): नाशिक महानगरपालिका विकास आराखड्यानुसार साधूग्राम व संलग्न सुविधांसाठी एकूण सुमारे ३७७ एकर क्षेत्र आरक्षित करण्यात आलेले आहे. यापैकी सुमारे ९४ एकर क्षेत्र महानगरपालिकेकडून संपादित करण्यात आले असून उर्वरित २८३ एकर क्षेत्राचे संपादन प्रलंबित आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात उपलब्ध मोकळ्या जागेचा वापर मंदिरांशी संलग्न व्यवस्था व आखाड्यांच्या निवासासाठी केला जातो. त्यामुळे आरक्षित क्षेत्राचे संपादन व हस्तांतरण न करता ही कारवाई रद्द करण्यात यावी, अशी मागणी संस्थांच्या प्रतिनिधींनी सुनावणीत नोंदविली आहे.
आगामी कुंभमेळा २०२६-२७ दरम्यान साधूग्राम तसेच अन्य पूरक सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर जागेची आवश्यकता भासणार असल्याने, माननीय शासनाने आरक्षित क्षेत्र संपादन करण्याचे अधिकार नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणास प्रदान केले आहेत. प्राधिकरणाने ही कार्यवाही महानगरपालिकेमार्फत करण्याचे निर्देश दिले आहेत. सदर निर्देशांच्या अनुषंगाने महानगरपालिकेतर्फे आरक्षित क्षेत्र संपादनाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. प्रक्रियेनुसार प्रथम संबंधित जमीनमालकांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी महानगरपालिका स्तरावर सुनावणी घेण्यात आली. आरक्षित क्षेत्रातील सुमारे ६७ एकर क्षेत्र हे १३ सार्वजनिक ट्रस्ट व संस्थांच्या मालकीचे असल्याने, प्रथम त्यांना त्यांचे मत मांडण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. झालेल्या सुनावणीत संबधित संस्थांनी सांगितले की त्यांच्या मालकीच्या क्षेत्रात सद्यस्थितीत मंदिर, सभामंडप, गोशाळा इत्यादी बांधकामे असून त्या जागेचा उपयोग धार्मिक व सामाजिक कार्यासाठी केला जात आहे.