१०० रुपयांच्या नोटेवर दाखवले भारताचे तीन भाग
मुंबई : विशाल आणि बलाढ्य अशी जगाच्या नकाशावर ओळख असलेल्या भारताच्या तुलनेत टीचभर असलेल्या नेपाळने पुन्हा बेटकुळ्या फुगवून दाखवायला सुरुवात केली आहे. भारतासोबत पुन्हा पंगा घेण्याची हिंमत नेपाळने दाखवली आहे. गुण नाही पण वाण लागला, या म्हणीप्रमाणे नेपाळ्यांनी चीनसारखे वाकडे पाऊल टाकले आहे. नेपाळने आपल्या १०० रुपयांच्या नव्या चलनी नोटेवर छपाई केलेल्या नकाशात भारताचे तीन भूभाग दाखवले आणि ते आपले असल्याचा दावा केला आहे. यावरून नवा वाद उफाळून येण्याची चिन्हे आहेत.
नेपाळच्या या अजब कृतीने भारतासोबतचा निवळलेला तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नेपाळच्या केंद्रीय बँकेने गुरुवारी १०० रुपयांची नोट चलनात आणली. त्यामध्ये देशाचे सुधारित राजनैतिक मानचित्र छापण्यात आले आहे. १०० रुपयांच्या चलनी नोटेवर छापलेल्या मानचित्रात नेपाळने कालापानी, लिपुलेख आणि लिंपीयाधुरा आदी भूभाग आपल्या देशाचाच भाग आहे अशा स्वरूपात दाखवले आहे.
आपली ‘उंची’ किती? आपण करतोय काय? अशी अवस्था असलेल्या नेपाळला भारताने त्यांची योग्य जागा दाखवली आहे. नेपाळचे हे पाऊल एकतर्फी व कृत्रिम क्षेत्रीय विस्तार असल्याचे भारताने म्हटले आहे. नेपाळ राष्ट्र बँक अर्थात एनआरबीद्वारे जारी केलेल्या नव्या नोटेवर माजी गव्हर्नर डॉ. महाप्रसाद अधिकारी यांची स्वाक्षरी आहे, तर तिथी विक्रम सवंत २०८१ (२०२४ ईस्वी) अशी आहे.
तत्कालीन पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या नेतृत्वातील सरकारने मे २०२० मध्ये संसदेत संविधान सुधारणा मंजूर करून कालापानी, लिपुलेख आणि लिंपीयाधुरा हे भूभाग आपल्या देशात समाविष्ट करून नव्या मानचित्राला अधिकृत मान्यता दिली होती. तेच सुधारित मानचित्र आता १०० रुपयांच्या नव्या चलनी नोटेवर छापण्यात आले आहे.
माजी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या कृतीचा हा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे. याच ओलींना तरुणाईच्या आंदोलनानंतर पायउतार व्हावे लागले होते.
भारताने नेपाळला ठणकावले
भारताने नेपाळच्या या कृतीवर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. लिपुलेख, कालापानी आणि लिंपीयाधुरा हे अविभाज्य भाग आहेत आणि नेपाळने उचललेले हे पाऊल अत्यंत चुकीचे आणि अस्वीकारार्ह आहे, असे भारताने ठणकावून सांगितले आहे. दरम्यान, नेपाळची सीमा भारताची पाच राज्ये सिक्कीम, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड यांना लागून आहे. काही भूभागांवरून या दोन देशांमध्ये बऱ्याच काळापासून सीमावाद सुरू आहे.